मुंबई : महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीत परस्परांवर होणारे आरोप – प्रत्यारोप, एकमेकांची काढली जाणारी ऊणीदुणी, निर्माण झालेली कटुता चुकीची आहे. कल्याण – डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात उद्विग्न होऊन मागे एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. पुढे नंतर सारे सुरळीत झाले. आताही आरोप झाले तरी सारे काही सुरळीत होऊन निकालानंतर १६ जानेवारीला एकत्र बसून तिळगूळ भरवू व तोंड गोड करू, असा विश्वास राष्ट्रवादीचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी बुधवारी ‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला.

अजित पवारांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ‘पवारांना बरोबर घेऊन पश्चाताप झाला’ असे प्रत्युत्तर दिले. चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर सिंचन घोटाळ्याच्या खटल्याची आठवण करून देतानाच“जुनी पाने पलटी करायला भाग पाडू नका’ असा इशारा दिला आहे. याकडे तटकरे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, महायुतीत असे आरोप होणे, उणीदुणी काढणे चुकीचेच आहे. या संदर्भात माझे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री बावनकुळे यांच्याशी बोलणे झाले आहे. सारे काही सुरळीत होईल.

निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत असे आरोप – प्रत्यारोप होतात. त्यातून काहींचा संयम सुटतो. २०१५ मध्ये कल्याण – डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात भाजपकडून पोलिसांच्या मदतीने दडपशाही केली जात असल्याचा आरोप करीत तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्गिन्न अवस्थेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राजानीमा सोपविला होता. ‘रामदास कदम तुमचा पगार किती, बोलता किती ’, असा सवाल मुख्यमंत्री फडणवीस यांनी तेव्हा केला होता. शिवसेनेचे मंत्री खिशात राजीनामे घेऊन फिरतात, असे सांगितले जात होते. पण सरकारचा पाच वर्षांचा कारभार पूर्ण होईपर्यंत सारे काही सुरळीत सुरू होते, असे तटकरे यांनी अधोरेखीत केले.

आताही कटुता आली असली तरी सारे काही सुरळीत होईल. नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात काहीशी कटुता आली होती. पण निकालानंतर आम्ही सर्व एकत्र बसलो. तसेच महानरपालिका निवडणुकीबाबत होईल. १६ तारखेच्या निकालानंतर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, रवीद्र चव्हाण, मी असे सारे एकत्र बसून परस्परांना तिळगूळ भरवू, असे सांगत तटकरे यांनी भाजपकडून कितीही आरोप झाले तरी राष्ट्रवादी ताणून धरण्याच्या मन:स्थितीत नाही, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.

खरी चुरसा महायुतीमध्ये :

राज्यात महायुती सर्वत्र एकत्र लढत नाही, त्याप्रमाणे महाविकास आघाडीसुद्धा वेगवेगळे लढत आहे. यावेळी फार चुरस नाही. खरी चुरस महायुतीमध्येच आहे. नगरपालिका-नगरपंचायती निवडणुकांमध्ये महायुतीने ८० टक्के जागा जिंकल्या, त्याची महानगरपालिका निवडणुकांमध्ये पुनरावृत्ती होईल. विरोधकांना मतविभागणीचा लाभ होऊ नये, म्हणून आम्ही वेगळे लढण्याची रणनिती आखली आहे. त्याचवेळी कटुता निर्माण होवू द्यायची नाही, असे ठरवले आहे. पण, प्रचारात टीका टिपण्णी होते. मने दुखावली जातात, असे तटकरे यांनी सांगितले.

मित्रपक्षांवरील टीका गैर नाही :

राष्ट्रवादी १९९९ पासून आघाडीत निवडणुका लढवते आहे. तेव्हा आमच्यावर मित्रपक्ष काँग्रेसकडून टीका होत असे. शरद पवारांना किती लक्ष्य करण्यात आले होते. पण, म्हणून आमचे राज्यातले आघाडीचे सरकार कोसळले नाही. राष्ट्रवादीची स्थापना शरद पवार यांनी केली, तेव्हा काँग्रेसने जोरदार टीका केली होती. पण, म्हणून काही आम्ही भाजपबरोबर गेलो नाही.. इतके होऊनही विलासराव देशमुखांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी सामील होता.. निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची उमेद वाढवण्यासाठी नेते बोलत असतात, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.