मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या उमेदवारांची प्रतिज्ञापत्रे निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली आहेत. मुंबई महापालिकेतील सत्ताधारी पक्षाचे उमेदवार कोट्यधीश असून सर्वात श्रीमंत उमेदवारांमध्ये शिवसेना (शिंदे) पक्षाचे समाधान सरवणकर आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या उमेदवार माजी महापौर श्रद्धा जाधव यांचा समावेश आहे. तर भाजपचे मुलुंडमधील माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे, नील सोमय्या, प्रकाश गंगाधरे यांच्या संपत्तीत गेल्या नऊ वर्षांत नऊ ते दहा कोटींची वाढ झाली आहे. सर्वात जास्त वाढ समाधान सरवणकर यांच्या संपत्तीत झाली असून नऊ वर्षांत त्यांच्या संपत्तीत ३७ कोटींची वाढ झाली आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूक येत्या १५ जानेवारी रोजी होणार आहे. या निवडणुकीत २२७ प्रभागांसाठी १७०० उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. या उमेदवारांची प्रतिज्ञापत्रे निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली आहेत. या प्रतिज्ञापत्रातून उमेदवारांच्या आर्थिक स्थितीचा मतदारांना अंदाज येणार आहे. या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेले स्थावर आणि जंगम मालमत्तेचे आकडे सर्वसामान्य मतदारांना चक्रावून टाकणारे आहेत. गेल्या नऊ वर्षांत करोना व टाळेबंदीमुळे सर्वसामान्यांच्या नोकरी व व्यवसायावर परिणाम झालेला असताना, सर्वसामान्यांचे आर्थिक नुकसान झालेले असताना माजी नगरसेवकांच्या उत्पन्नात मात्र कोट्यवधींची वाढ झालेली दिसते आहे.
भाजपच्या उमेदवारांच्या मालमत्तेत वाढ
भाजपचे मुलुंडमधील माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे, प्रकाश गंगाधरे आणि नील सोमय्या यांच्या एकूण मालमत्तेत प्रचंड वाढ झालेली आहे. प्रभाकर शिंदे यांच्या मालमत्तेत नऊ वर्षांत सुमारे सहा कोटींची वाढ झाली आहे.तर प्रकाश गंगाधरे यांच्या मालमत्तेत १० कोटींची वाढ झाली आहे. माजी खासदार किरिट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या मालमत्तेत ८ कोटींची वाढ झाली आहे. नुकत्याच भाजपमध्ये गेलेल्या तेजस्वी घोसाळकर यांची मालमत्ता ५ कोटी १५ लाख असून २०१७ च्या तुलनेत त्यांच्या मालमत्तेत पावणे पाच कोटींची वाढ झाली आहे.
माजी महापौर कोट्यवधी
माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्याकडे एकूण ४६ कोटी ३४ लाखांची मालमत्ता आहे. ११ विविध वाहने असून त्यांची किंमतच १ कोटी ३७ लाख आहे. तर १६० तोळे दागिने आहेत. विधानसभा निवडणूकीच्यावेळी २०२४ मध्ये त्यांची मालमत्ता ४४ कोटी होती ती आता ४६ कोटी झाली आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ झाली आहे. तर माजी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांच्याकडे २५ कोटींची मालमत्ता आहे.
शिवसेना (शिंदे) पक्षात गेलेल्यांच्या मालमत्तेत वाढ
शिवसेना (शिंदे) पक्षाते गेलेले माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांची मालमत्ता ४६ कोटी असून २०१७ च्या तुलनेत त्यात ३७ कोटींची वाढ झाली आहे. तर खासदार रविंद्र वायकर यांची मुलगी दिप्ती वायकर यांच्याकडे २२ कोटींची मालमत्ता आहे. माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव यांच्याकडे १४ कोटींची मालमत्ता असून विधानसभा निवडणुकीच्यावेळी त्यांच्याकडे १० कोटींची मालमत्ता होती. दहिसरमधील माजी नगरसेवक संजय घाडी यांच्याकडे १२ कोटी ८४ लाखांची मालमत्ता असून २०१७ च्या तुलनेत ९ कोटींची वाढ झाली आहे.
प्रथम निवडणूक लढवणारे श्रीमंत उमेदवार
मनसेचे यशवंत किल्लेदार यांच्याकडे ७ कोटीची मालमत्ता आहे. तर आमदार समाधान सरवणकर यांची कन्या प्रिया सरवणकर यांच्याकडे १२ कोटींची मालमत्ता आहे.
| उमेदवार | २०१७ ची मालमत्ता | २०२५ ची मालमत्ता |
| तेजस्वी घोसाळकर (भाजप) | २५ लाख ८२ हजार | ५ कोटी १५ लाख |
| प्रकाश गंगाधरे (भाजप) | २ कोटी ४७ लाख | १२ कोटी ८८ लाख |
| प्रभाकर शिंदे (भाजप) | ११ कोटी ९० लाख | १७ कोटी ६३ लाख |
| नील सोमय्या (भाजप) | १ कोटी ९९ लाख | ९ कोटी ८९ लाख |
| रवी राजा (भाजप) | ५ कोटी १२ लाख | १० कोटी १२ लाख |
| शीतल म्हात्रे (काँग्रेस) | १७ लाख २९ हजार | ४ कोटी २७ लाख |
| संजय घाडी (शिवसेना-शिंदे) | ३ कोटी १० लाख | १२ कोटी ८४ लाख |
| समाधान सरवणकर (शिवसेना -शिंदे) | ९ कोटी ४३ लाख | ४६ कोटी ५९ लाख |
| सुजाता पाटेकर (शिवसेना -ठाकरे) | ३ कोटी ३७ लाख | १२ कोटी १४ लाख |
| किशोरी पेडणेकर (शिवसेना -ठाकरे) | १ कोटी ६१ लाख | ५ कोटी २६ लाख |
