मुंबई: मुंबई महापालिकेच्या निवडणूकीच्या रिंगणात उतरलेल्या एकूण १७०० उमेदवारांपैकी तब्बल ११२७ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. म्हणजेत तब्बल ६६ टक्के उमेदवारांना इतकी कमी मते मिळाली आहेत की त्यांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवारांमध्ये ५४६ अपक्ष आहेत. तर राजकीय पक्षांमध्ये सर्वाधिक राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

मुंबई महापालिकेच्या २२७ प्रभागांसाठी निवडणूक नुकतीच पार पडली असून त्याचे निकालही लागले आहेत. या निवडणूकीच्यावेळी एकूण १७०० उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात होते. त्यात ८२१ पुुरुष उमेदवार तर ८७९ महिला उमेदवार होते. तर निवडणूकीच्या रिंगणात तब्बल २९ विविध पक्ष उतरले होते. मात्र त्यात प्रमुख लढत ही भाजप – शिवसेना (शिंदे) महायुती विरुद्ध शिवसेना (ठाकरे) आणि मनसे ठाकरे बंधू युती अशीच झाली. त्यामुळे या चार पक्षांव्यतिरिक्त सर्वच उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.

२२७ प्रभागांसाठी १७०० उमेदवार असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. या निवडणूकीसाठी सर्वसाधारण उमेदवारांसाठी पाच हजार रुपये अनामत रक्कम होती. तर आरक्षित प्रवर्गासाठी आणि महिलांसाठी ही रक्कम २५०० इतकी होती. ही रक्कम कमी असली तरी अनामत रक्कम जप्त होणे ही कोणत्याही उमेदवारासाठी लाजीरवाणी बाब असते. अनेक प्रभागांमध्ये अपक्ष, बंडखोर, लहानलहान पक्षांचे उमेदवार निवडणूक लढवत होते. तर काही ठिकाणी केवळ मते फोडण्यासाठी उमेदवार उभे केले होते. त्यामुळे मतपत्रिकेवर उमेदवारांची मोठी यादी होती. त्यांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.

निवडणूक आयोगाच्या निकषांनुसार उमेदवाराला एकूण वैध मतांच्या एक षष्ठमांश म्हणजेच १६.३३ टक्के मते किंवा त्यापेक्षा कमी मते मिळाल्यास त्याची अनामत रक्कम जप्त होते. अनामत रक्कम जप्त झाल्यामुळे आर्थिक फटका फारसा बसत नसला तरी तो त्या उमेदवाराचा राजकीय मानभंगच असतो. त्यामुळे विरोधकांचे डिपॉझिट जप्त होणार अशा वल्गना उमेदवार विरोधकांना आव्हान देताना करत असतात.

अनामत रक्कम जप्त झालेले एकूण उमेदवार – ११२७

  • अपक्ष – ५४६
  • राष्ट्रवादी – ७७
  • बहुजन समाज पार्टी – ७५
  • काँग्रेस – ७२
  • आम आदमी पक्ष – ६१
  • समाजवादी पक्ष – ५३
  • वंचित बहुजन आघाडी – ४४