मुंबई : महापालिकेच्या केईएम, नायर आणि शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयाप्रमाणेच महापालिकेच्या उपनगरी आणि विशेष रुग्णालयांतील परिचारिकांनाही दर महिन्याला आठ सुट्टय़ा मिळाव्यात या मागणीसाठी गेल्या आठवडय़ात आंदोलन केले होते. त्यानंतर प्रशासनाने प्रायोगिक तत्त्वावर अशा सुट्टय़ा देण्याचे मान्य केले होते. मात्र त्याबाबतचा आदेश न निघाल्यामुळे सर्व परिचारिकांनी २६ सप्टेंबर रोजी पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

 महापालिकेच्या १६ उपनगरी रुग्णालये, विशेष रुग्णालये आणि प्रसूतिगृहात काम करणाऱ्या परिचारिकांना आठ साप्ताहिक सुट्टय़ा मिळत नाहीत. त्यामुळे या मागणीसाठी गेल्या आठवडय़ात शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयातील परिचारिकांनी आंदोलन केले होते. त्यानंतर कस्तुरबा रुग्णालयातील परिचारिकांनीही आंदोलन केले. म्युनिसिपल मजदूर युनियनच्या नेतृत्वाखाली विविध संघटनांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता.

या आंदोलनानंतर महापालिका प्रशासनाने मागणी मान्य केली होती. तसेच याबाबतचा प्रस्तावही तयार करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप प्रस्ताव तयार न झाल्यामुळे संघटनेने प्रशासनाला एक आठवडय़ाची मुदत दिली असून २६ सप्टेंबर रोजी परळ येथील एफ दक्षिण विभाग कार्यालयातील आरोग्य कार्यालयासमोर मोर्चाचा इशारा दिला.