निम्मे शैक्षणिक वर्ष सरत आले तरी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील मुलांना अद्याप गणवेश मिळालेला नाही. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांचा गणवेश चालू शैक्षणिक वर्षापासून बदलण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. ऑगस्टमध्ये गणवेशासाठी कार्यादेश देण्यात आले होते. परंतु अद्याप विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले नाहीत.

हेही वाचा >>>मुंबई : तरुणीच्या हत्ये प्रकरणी तीन महिलांना अटक ; अनैतिक संबंधातून हत्या

गेली अनेक वर्षे मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थी-विद्यार्थीनी निळ्या रंगाचा गणवेश वापरत होते. यावर्षीपासून गणवेश बदलण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. विद्यार्थ्यांना निळ्या रंगाऐवजी मोतीया रंगाचा (क्रीम कलर) गणवेश देण्यात येणार आहे. १५ सदस्यांच्या समितीने हा गणवेश निश्चित केला आहे. मात्र शाळा सुरू होऊन पाच महिने झाले तरी अद्याप विद्यार्थ्यांना नवीन गणवेश मिळालेला नाही. त्यामुळे काही विद्यार्थी जुनाच गणवेश परिधान करून शाळेत येत आहेत. तर काही विद्यार्थी गणवेशाऐवजी अन्य कपडे परिधान करून शाळेत येत आहेत. महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दरवर्षी २७ शैक्षणिक वस्तू मोफत दिल्या जातात. यंदा मात्र शाळा सुरू झाल्या तरी शैक्षणिक वस्तूंचे वितरण न झाल्यामुळे महापालिकेवर टीका झाली होती. त्यानंतर हळूहळू एकेक वस्तू देण्यात आल्या. शिक्षण विभागाने छत्री व दप्तरासाठी विद्यार्थ्यांना रोख रक्कम दिली. मात्र गणवेश अद्यापही विद्यार्थ्यांना मिळालेला नाही.

हेही वाचा >>>वांद्रे-वरळी सागरीसेतूवरील सुरक्षितेच्या उपाययोजनांचा आढावा घेणार , आवश्यक ते बदल करणार- एमएसआरडीसी

मुंबई महानगरपालिकेच्या सर्व शाळा आता मुंबई पब्लिक स्कूल म्हणून ओळखल्या जातात. तसेच एसएससी बोर्डव्यतिरिक्त सीबीएसई, आयसीएसई आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या शाळाही महानगरपालिकेने सुरू केल्या आहेत. या सर्व बदलांबरोबरच गणवेश बदलण्याची प्रक्रियाही शिक्षण विभागाने सुरू केली होती. यंदा महानगरपालिकेच्या शाळेत एक लाख मुलांनी नव्याने प्रवेश घेतला आहे. त्यामुळे वि्दयार्थ्यांची संख्या चार लाखांवर पोहोचली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांसाठी गणवेशाच्या दोन जोडी, क्रीडा गणवेश पुरवठा करण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे. गणवेश पुरवठादार निश्चित करण्याची प्रकिया जुलै अखेरीस पूर्ण झाली होती व ऑगस्टमध्ये कार्यादेश देण्यात आले होते. चार लाख विद्यार्थ्यासाठी ८८ कोटी ७८ लाख ६५ हजार ३३४ रुपये खर्च येणार आहे.मुंबई महानगरपालिकेच्या ९७३ प्राथमिक व २४३ माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये चार लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.