मुंबईत MBBS चा अभ्यास करणारी एक विद्यार्थिनी वर्षभराहून अधिक काळ बेपत्ता होती. तिची हत्या करण्यात आली. मात्र पोलिसांना अद्याप तिचं प्रेत आढळलेलं नाही. पण पोलिसांनी अवघ्या एका सेल्फीवरून आरोपीला अटक केली आहे. काय काय घडलं आणि आरोपीला पोलिसांनी कसं पकडलं ते आपण जाणून घेणार आहोत. पोलिसांच्या हाती हा महत्त्वाचा पुरावा आला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेली साक्ष आणि त्यानंतर समोर आलेल्या घटना यावरून पोलिसांनी या प्रकरणात अटक केली आहे. नेमकं काय काय घडलं?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय घडलं २९ नोव्हेंबर २०२१ ला?

२९ नोव्हेंबर २०२१ ला मुंबईपासून जवळ असलेल्या बोईसर भागात राहणारी २२ वर्षांची सदिच्छा साने आपल्या घरून निघाली. सकाळी साधारण ९ च्या सुमारास तिने घर सोडलं. तिला मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात परीक्षा देण्यासाठी जायचं होतं त्यामुळे तिने लवकर घर सोडलं होतं. मात्र परीक्षेसाठी ती तिथे पोहचलीच नाही. तसंच ती घरीही परतली नाही. तिच्या घरातल्यांनी तिची बरीच वाट पाहिली पण जेव्हा ती परतली नाही तेव्हा दुसऱ्या दिवशी तिच्या घरातल्यांनी ती हरवल्याची तक्रार पोलिसात दिली.

हे पण वाचा मुंबई : पालघरमधील बेपत्ता मुलीची हत्या; पोलीस चौकशीत आरोपीची कबुली

सदिच्छा बेपत्ता झाल्याने कुटुंबीय चितेंत

सदिच्छा मनिष साने असं या मुलीचं नाव आहे. तिच्या घरी तिचे वडील, आई आणि ८० वर्षांची आजी राहतात. सदिच्छा ही एकुलती एक मुलगी होती. ती बेपत्ता झाल्याने सगळं घर हादलं. बोईसर पोलिसांकडे ते वारंवार जात राहिले पण सदिच्छाचा पत्ता लागला नाही. त्यामुळे भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांच्याकडे हे कुटुंब गेलं. चित्रा वाघ यांनी या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर पोलिसांनी १० डिसेंबर २०२१ ला केस दाखल करून घेतली.

बोईसर पोलिसांनी त्यानंतर मग सदिच्छा सानेचा शोध सुरू केला. ती कुठे कुठे गेली होती? २९ नोव्हेंबरला ती कुठल्या कुठल्या ठिकाणी गेली त्याचा सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेण्यास सुरूवात केली. सीसीटीव्हीवरून पोलिसांना समजलं की विरार स्टेशनवरून ती अंधेरी स्टेशनला उतरली होती. त्यानंतर अंधेरीहून बांद्रा या ठिकाणी जाण्यासाठी तिने दुसरी ट्रेन पकडली. त्यानंतर ती बांद्रा या ठिकाणी उतरली. बांद्रा या ठिकाणी उतरून ती बँडस्टँडला गेली. त्यामुळे ती उतरली ते शेवटचं ठिकाण मुंबईतलं बांद्र्यातलं बँड स्टँड होतं हे पोलिसांना स्पष्ट झालं. यानंतर बोईसर पोलिसांनी हा तपास बांद्रा पोलिसांकडे सोपवला.

बोईसर पोलिसांकडून प्रकरण बांद्रा पोलिसांकडे

बांद्रा पोलिसांनी सदिच्छाचा शोध सुरू केला. तेव्हा त्यांनी तिच्या मोबाइलचं शेवटचं लोकेशन काय होतं? ते शोधण्यासाठी ट्रॅकिंग सुरू केलं. त्यावेळी पोलिसांना हे कळलं की दुपारी ३ वाजेपर्यंत सदिच्छा सानेचा मोबाईल सुरू होता. त्यामुळे यावर शिक्कामोर्तब झालं की ती बँडस्टँडला आली होती आणि तेच तिचं शेवटचं लोकेशन होतं. आता पोलिसांपुढे एक आव्हान होतं की एवढ्याश्या माहितीवरून सदिच्छाला कसं शोधणार?

हे पण वाचा Sadichha Sane Case : मिथू सिंहला तीनदा भेटली सदिच्छा, पण अखेरच्या वेळी…; खून प्रकरणाला वेगळं वळण

पोलिसांनी गुन्हे शाखेकडे प्रकरण केलं वर्ग

बांद्रे पोलिसांनी ही केस क्राईम ब्रांच अर्थात गुन्हे शाखेकडे सोपवलं. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच युनिट क्रमांक ९ ने सदिच्छा सानेचा शोध सुरू केला. त्यांनीही विरार ते बांद्रा असं सगळं सीसीटीव्ही फुटेज तपासलं. पण बँडस्टँडच्या पुढे तपास जात नव्हता.

लाइफगार्ड मिठ्ठू सिंहसोबत दिसली होती सदिच्छा साने

अशात एका पात्राची या प्रकरणात एंट्री झाली. याचं नाव होतं मिथू सिंह. मिथू सिंह हा एक लाइफगार्ड आहे. २९ नोव्हेंबरला तो बँडस्टँड या ठिकाणी काम करत होता. २९ नोव्हेंबरला मिथू सिंह सोबत सदिच्छाला पाहिलं गेलं होतं. गुन्हे शाखेला असे काही प्रत्यक्षदर्शीही सापडले ज्यांनी मिथू सिंह आणि सदिच्छा यांना सोबत पाहिलं होतं आणि तो दिवस होता २९ नोव्हेंबर २०२१ म्हणजेच सदिच्छा गायब झाली तोच दिवस. यानंतर गुन्हे शाखेने मिठ्ठूला ताब्यात घेतलं त्याची चौकशी सुरू केली. त्याने आपण सदिच्छाला भेटलो होतो हे मान्य केलं पण ती बेपत्ता कशी झाली ते माहित नाही असं म्हणत कानावर हात ठेवले. पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू होता. त्यानंतर पोलिसांना एक पुरावा सापडला तो पुरावा होता सदिच्छासोबत काढण्यात आलेल्या काही सेल्फीजचा.

मिथूसोबत सदिच्छाचा सेल्फी होता. त्यामुळे मिठ्ठू सिंहकडेच संशयाची सुई वळत होती. पोलिसांना हेदेखील समजलं की मिथू सिंहने दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३० नोव्हेंबर २०२१ ला सदिच्छा सानेला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्टही पाठवली होती. याचाच अर्थ तो सदिच्छाच्या संपर्कात होता. पोलिसांनी त्याची नार्को टेस्ट केली आणि ब्रेन मॅपिंग टेस्टही केली. मात्र यातूनही पोलिसांच्या हाती काहीही लागलं नाही.

१४ महिन्यांनी प्रकरणात आला मोठा ट्विस्ट

१४ महिने सदिच्छा बेपत्ता झाल्याचं प्रकरण आणि तिचा शोध सुरूच होता. पोलिसांनी पुन्हा एकदा सदिच्छाला शेवटचं भेटलेल्या मिथू सिंहला आणि त्याचा मित्र जब्बार अन्सारी या दोघांना अटक केली. क्राईम ब्रांचने हे सांगितलं की मिठ्ठू सिंहला आम्ही सदिच्छाच्या हत्येच्या आरोपाखाली तर जब्बार अन्सारीला पुरावे नष्ट करण्याच्या आरोपांखाली अटक करत आहोत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार मिथू सिंह हा सदिच्छा सानेचा पाठलाग करत होता. सदिच्छा साने समद्रातल्या खडकांमध्ये चालली होती त्यावेळी तिला मिठ्ठू सिंहने पाठीमागून पकडलं होतं. मिथू सिंहला तिने सांगितलं की मी आत्महत्या करायला जात नाही. त्यानंतर पहाटे साडेतीनपर्यंत मिथू आणि सदिच्छा साने गप्पा मारत होते. पोलिसांनी सांगितलं की सदिच्छाची हत्या मिठ्ठूने केली. त्यानंतर लाइफ जॅकेट घालून समुद्राच्या आत तो जवळपास १५० मीटर गेला होता. तिथे त्याने सदिच्छा सानेचा मृतदेह फेकून दिला. एका सेल्फीवरून पोलिसांनी मिथू सिंहला अटक केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai murder mystery mumbai mbbs student sadichha sane murder mystery selfie reveal case scj
First published on: 06-02-2023 at 16:01 IST