डिसेंबरमध्ये काम  पूर्ण होणार

मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गातील शिर्डी – मुंबई टप्प्याच्या कामाने वेग घेतला आहे. शिर्डी – इगतपुरी टप्प्याचे काम येत्या काही महिन्यात पूर्ण होणार आहे.  त्याचवेळी या मार्गिकेतील शेवटच्या इगतपुरी –  आमणे टप्प्याचे काम ही वेगात सुरू असून आतापर्यंत या टप्प्याचे ७९ टक्के काम पूर्ण झाले आहे. हे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) निर्धार केला आहे. काम पूर्ण झाल्यानंतर तात्काळ हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार असून हा टप्पा सुरू झाल्यास मुंबई – नागपूर असा संपूर्ण महामार्ग कार्यान्वित होईल आणि मुंबई – नागपूर अंतर केवळ आठ तासात पार करणे शक्य होईल. दरम्यान, समृद्धी महामार्गातील सर्वात कठीण आणि आव्हानात्मक काम असलेला  हा टप्पा आहे.

हेही वाचा >>> मुंबईतील ‘या’ दोन मेट्रो स्थानकांवर आता असणार माहिलाराज, मेट्रो स्थानक चालविण्याची संपूर्ण जबाबदारी महिलांवर

Megha Engineering, Eight tenders,
एमएसआरडीसीच्या दोन प्रकल्पांसाठी मेघा इंजिनिअरिंगच्या आठ निविदा, निवडणूक रोखे खरेदीतील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी
Mumbai, tenders, projects,
मुंबई : तीन प्रकल्पांसाठी ८२ निविदा, आचारसंहितेनंतरच अंतिम निर्णयाची शक्यता
The Central Wildlife Board proposed a highway through the largest tiger project in the country
देशातील सर्वात मोठय़ा व्याघ्रप्रकल्पातून महामार्ग जाणार
1311 objections to the proposed Shaktipeeth Highway
प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोधासाठी १३११ हरकती

एमएसआरडीसी ७०१ किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाची बांधणी करीत  आहे. ५५ हजार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या या महामार्गाच्या कामाच्या पूर्णत्वास काहीसा विलंब झाला आहे. त्यामुळे हा महामार्ग टप्प्याटप्प्याने पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करण्यात येत आहे. त्यानुसार डिसेंबर २०२२ मध्ये नागपूर – शिर्डी असा ५२० किमीचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. या महामार्गामुळे नागपूर – शिर्डी अंतर केवळ पाच तासांत पार करता येत आहे. पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर आता एमएसआरडीसीने पुढील कामास वेग दिला आहे. शिर्डी – मुंबई (आमणे) या पुढील   टप्प्याचे तीन टप्प्यात काम करण्यात येत आहे. शिर्डी – भरवीर, भरवीर – इगतपुरी आणि इगतपुरी – आमणे असे हे तीन टप्पे आहेत. यातील शिर्डी – भारवीर टप्पा मार्चमध्ये, भरवीर – इगतपुरी टप्पा जूनमध्ये पूर्ण करण्याचे नियोजन एमएसआरडीसीचे आहे. या दोन टप्प्याचे काम वेगात सुरू असतानाच आता समृद्धी महामार्गातील सर्वात कठीण, अवघड आणि आव्हानात्मक कामानेही वेग घेतला आहे.

हेही वाचा >>> वीजबिल भण्यासाठी ऑनलाईन लिंक पाठवून नागरिकांची फसवणूक, दोघांना रांचीतून केली अटक; मुंबई पोलिसांची कारवाई

इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्यात तब्बल बारा बोगदे असून यातील एक बोगदा आठ किमीचा आहे. तर उर्वरित अकरा बोगदे सरासरी एक किमीचे आहेत. कसारा घाटातून हे बोगदे जाणार असून या बोगद्यामुळे कसाराघाट लवकरच अगदी पाच-सहा मिनिटात पार करता येणार आहे.  या टप्प्यात  १६ व्हायाडक्टचा (उंच पूल, दरीवरून रेल्वे मार्गावरून जाणारा रस्ता)  समावेश आहे.  मोठमोठी दरी पार करत महामार्ग जाणार असल्याची माहिती एमएसआरडीसीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. नाशिकमधील वशाळा येथील एका दरीवरून महामार्ग जाणार असून येथील पूलाचे खांब तब्बल ८४ मीटर म्हणजेच २७५ फूट इतके उंच आहेत. एकूणच बारा बोगदे आणि १६ उंच पुलाचा समावेश या शेवटच्या इगतपुरी – आमणे टप्प्यात असून हे काम अंत्यत कठीण आणि आव्हानात्मक असल्याचे  या अधिकाऱ्याने सांगितले.  हे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करून हा शेवटचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

फूड प्लाझासाठी एक निविदा

मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गातील ७०१ पैकी ५२०किमीचा नागपूर – शिर्डी टप्पा डिसेंबरपासून सुरू झाला आहे. मात्र हा मार्ग सुरू करताना यात खानपानासह इतर कोणत्याही आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.  संपूर्ण ७०१ किमीवर या सोयी पुरविण्यासाठी एमएसआरडीसीने निविदा मागविल्या होत्या. १६ ठिकाणी फूड प्लाझा, पेट्रोल पंप आणि इतर सुविधा पुरविण्यासाठी ही निविदा जारी करण्यात आली होती. मात्र  या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने दोन वेळा फेरनिविदा काढण्यात आली.  दुसऱ्या फेरनिविदेची मुदत गुरुवारी संपली असून अखेर एक निविदा सादर झाली आहे. तीन वेळा निविदा काढण्यात आल्याने एक निविदा आली तरी ती अंतिम करता येते.  आता एमएसआरडीसीकडून ही निविदा अंतिम केली जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास लवकरच फूडप्लाझाच्या कामाला सुरुवात होण्याची  शक्यता आहे.