Mumbai Nanded Express Train Update: एकीकडे मुंबईहून उत्तर प्रदेश, बिहारकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना नियमित रेल्वेगाडीचा दर्जा देण्याचा निर्णय रेल्वे मंडळाकडून घेण्यात येत आहे. परंतु, दुसरीकडे मुंबई ते नांदेड या महत्त्वाच्या मार्गावरील प्रस्तावित रेल्वेगाडी अद्यापही सुरू न झाल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. एलटीटी ते नांदेड दोन रेल्वेगाड्यांना रेल्वे मंडळाने ऑगस्ट २०२३ मध्ये मंजुरी दिली होती. मात्र, प्रत्यक्षात ती रेल्वेगाडी धावलीच नसून अद्यापही कागदावरच असल्याचे वास्तव समोर आले आहे.

गाडी क्रमांक १७६६५/१७६६६ हुजूर साहेब नांदेड – लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) – हुजूर साहेब नांदेड आणि गाडी क्रमांक १७६६७ /१७६६८ एलटीटी – हुजूर साहेब नांदेड – एलटीटी या रेल्वेगाड्यांना रेल्वे मंडळाने ऑगस्ट २०२३ मध्ये मंजुरी दिली होती. त्यानंतर या रेल्वेगाडीची उद्घाटन फेरी चालवून नियमित सेवा सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु, रेल्वे मंडळाने मंजुरी दिल्यानंतर. दोन वर्ष उलटून गेली तरी मुंबई – नांदेड मार्गावरील रेल्वे गाडी सुरू झाली नाही. मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली तसेच आसपासच्या जिल्ह्यांतील प्रवाशांसाठी ही गाडी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सध्या या भागातील प्रवाशांना थेट आणि नियमित रेल्वेसेवेचा अभाव जाणवत असून अनेकांना बदल करून प्रवास करावा लागतो. तसेच वंदे भारत एक्स्प्रेसचा प्रवास परवडणारा नसल्याने प्रवाशांना रस्ते मार्गाने मुंबई गाठत आहेत.

नांदेड हे धार्मिक, शैक्षणिक आणि व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचे केंद्र असून मुंबई – नांदेड दरम्यान थेट आणि सोयीस्कर रेल्वेसेवेची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. सध्या उपलब्ध गाड्यांमध्ये मोठी गर्दी असल्याने प्रवाशांना तिकीट मिळवणे कठीण जात आहे. मुंबई – नांदेड मार्गावरील रेल्वेगाडी सुरू झाल्यास मुंबईसह मराठवाड्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. तसेच या भागाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासालाही चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

रेल्वे मंडळाने नांदेड ते एलटीटी दरम्यान धावणाऱ्या दोन रेल्वेगाड्यांना मंजुरी दिली होती. मात्र, काही तांत्रिक आणि वाहतूकीच्या कारणामुळे या दोन रेल्वेगाड्यांच्या चार फेऱ्या सुरू झाल्या नाहीत. परंतु, त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. – ए. श्रीधर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, दक्षिण मध्य रेल्वे

मुंबईवरून बिहारला जाणारी रेल्वेगाडी नियमित

मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी एलटीटी ते धनबाद यांच्या दरम्यान नवीन साप्ताहिक सेवा सुरू केली आहे. गाडी क्रमांक १३३८० एलटीटी ते धनबाद साप्ताहिक एक्स्प्रेस दर बुधवारी धावेल. ही रेल्वेगाडी ८ एप्रिल रोजी सुरू झाली. तर, गाडी क्रमांक १३३७९ धनबाद ते एलटीटी (साप्ताहिक) ही गाडी दर सोमवारी धावेल. ही रेल्वेगाडी ६ एप्रिल रोजी सुरू झाली, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाद्वारे देण्यात आली.