मुंबई : मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) आणि हुजूर साहेब नांदेडदरम्यान नियमितपणे धावणाऱ्या दोन नवीन साप्ताहिक एक्स्प्रेस गाड्या सुरू करण्याची घोषणा केली. या रेल्वेगाडीमुळे मराठवाड्याला मुंबईची नवी रेल्वे जोडणी मिळाली आहे. या नव्या सेवेमुळे नांदेड, परभणी, हिंगोली, वाशीम, तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रवाशांचा मुंबईकडे प्रवास अधिक सुलभ होईल. ‘लोकसत्ता’मध्ये १० एप्रिल रोजी ‘मुंबई – नांदेड गाडी अजूनही कागदावरच’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाली होती. या बातमीची दखल घेत अनेक वर्षे कागदपत्रावर असलेली एक्स्प्रेस तीन महिन्यांत रेल्वे मार्गावर धावण्यास सज्ज झाली. आचारसंहितेमुळे या रेल्वेगाडीची सेवा दोन महिने रखडली होती.

गाडी क्रमांक १७६६५/१७६६६

हुजूर साहेब नांदेड – लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) – हुजूर साहेब नांदेड आणि

गाडी क्रमांक १७६६७ /१७६६८ एलटीटी – हुजूर साहेब नांदेड – एलटीटी या रेल्वेगाड्यांना रेल्वे मंडळाने ऑगस्ट २०२३ मध्ये मंजुरी दिली होती. त्यानंतर या रेल्वेगाडीची उद्घाटन फेरी चालवून नियमित सेवा सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु, रेल्वे मंडळाने मंजुरी दिल्यानंतरही मुंबई – नांदेड मार्गावरील रेल्वे गाडी सुरू झाली नाही. दोन वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतरही सदर गाडी सुरू न झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. प्रवाशांकडून आंदोलन, प्रशासनाशी पत्रव्यवहार केला जात होता. परंतु, प्रवाशांच्या मागणीला यश आले नव्हते. ही रेल्वेगाडी सुरू करण्याबाबत ‘लोकसत्ता’ने १० एप्रिल रोजी बातमीतून वाचा फोडली. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली. १९ एप्रिल रोजी रेल्वे विभागाने रेल्वे मंडळाशी पत्रव्यवहार करून, रेल्वेगाडी सुरू करण्यास प्राधान्य दिले.

रेल्वे प्रशासनाच्या मान्यतेनुसार गाडी क्रमांक १७६६५/१७६६६ नांदेड – एलटीटी – नांदेड साप्ताहिक एक्स्प्रेसची उद्घाटन फेरी १९ मे रोजी आणि या रेल्वेची सेवा २५ मेपासून सुरू होणार होती. तसेच, गाडी क्रमांक १७६६७/१७६६८ ही अतिरिक्त साप्ताहिक सेवा २० मे २०२६ पासून सुरू होणार होती. परंतु, आचारसंहिता लागू झाल्याने या रेल्वेगाडीची सेवा दोन महिने रखडली. तर, आता गाडी क्रमांक १७६६७/१७६६८ आणि १७६६५/१७६६६ या दोन साप्ताहिक एक्स्प्रेस मुंबई – नांदेड मार्गावर धावणार आहेत. गाडी क्रमांक १७६६७ नांदेड – एलटीटी एक्स्प्रेस ८ जुलैपासून, तर १७६६८ एलटीटी – नांदेड एक्स्प्रेस ९ जुलैपासून नियमित धावण्यास सुरुवात करेल. तसेच गाडी क्रमांक १७६६५ नांदेड – एलटीटी एक्स्प्रेस १३ जुलैपासून आणि १७६६६ एलटीटी – नांदेड एक्स्प्रेस १४ जुलैपासून सुरू होणार आहे.

गाडी क्रमांक १७६६८ एलटीटी – नांदेड साप्ताहिक एक्स्प्रेस दर गुरुवारी दुपारी ४.५५ वाजता एलटीटीहून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ९.१० वाजता नांदेडला पोहोचेल. गाडी क्रमांक १७६६७ नांदेड – एलटीटी एक्स्प्रेस दर बुधवारी रात्री ९.१५ वाजता नांदेडहून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजता मुंबईत दाखल होईल. या रेल्वेगाडीला कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, अकोला, वाशिम, हिंगोली डेक्कन, बसमत आणि पूर्णा येथे थांबे देण्यात आला आहे.

गाडी क्रमांक १७६६६ एलटीटी – नांदेड एक्स्प्रेस दर मंगळवारी दुपारी ४.३५ वाजता एलटीटीहून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ९.१० वाजता नांदेडला पोहोचेल. गाडी क्रमांक १७६६५ नांदेड – एलटीटी एक्स्प्रेस दर सोमवारी रात्री ९.१५ वाजता नांदेडहून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १.४० वाजता मुंबईत पोहोचेल. या रेल्वेगाडीला कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, वाशिम, हिंगोली डेक्कन, बसमत आणि पूर्णा येथे थांबे असतील.

दोन्ही रेल्वेगाड्यांमध्ये एक वातानुकूलित प्रथम श्रेणी, दोन वातानुकूलित द्वितीय श्रेणी, सहा वातानुकूलित तृतीय श्रेणी, सात शयनयान, चार सामान्य द्वितीय श्रेणी डबे, एक जनरेटर व्हॅन आणि एक गार्ड्स ब्रेक व्हॅन अशी संरचना असेल.