Indian Navy In Mumbai On High Alert: भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव सध्या सीमावर्ती राज्यांपुरता मर्यादित असला तरी, पाकिस्तानने केलेल्या दहशतवादी हल्ल्यांचा भूतकाळातील अनुभव लक्षात घेता मुंबईभोवती सुरक्षा वाढवण्यात आली आहे. समुद्र आणि हवाई मार्गाने प्रवेशाचे पर्याय असल्याने सुरक्षेच्या चिंता वाढल्या आहेत, त्यामुळे भारतीय नौदलाने ताफा तैनात केला आहे. याचबरोबर नौदलाने मासेमारी नौका आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचीही तपासणी व नोंदणी सुरू केली आहे.
“मुंबईच्या किनाऱ्याभोवती पूर्णपणे सतर्कता आहे. येथे उत्तर आणि अरबी नौदलाला तैनात करण्यात आले आहे. मच्छीमार बोटी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवरही देखरेख वाढवण्यात आली आहे. त्यांना सतर्क राहण्यास आणि समुद्रात कोणत्याही असामान्य हालचाली आढळल्यास त्यांची माहिती देण्यास सांगितले आहे,” असे नाव न सांगण्याच्या अटीवर नौदलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. याबाबत इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.
२००८ च्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, सर्व बोटी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवणे आणि त्यांची दररोज तपासणी करणे खूप महत्वाचे आहे, असे या अधिकाऱ्याने पुढे म्हटले आहे.
“काही दिवसांपूर्वी नौदलाच्या प्रमुखांची मत्स्यव्यवसाय आयुक्तांसोबत बैठक झाली होती. मासेमारी अधिकाऱ्यांना बोटींचा नोंद, तपासणी आणि बोटींची संख्या, त्यांचे मालक आणि बोटीवरील कर्मचाऱ्यांची माहिती दररोज जाहीर करण्यास सांगण्यात आले आहे. याचबरोबर मच्छिमारांनाही सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे”, या असे अधिकाऱ्याने सांगितले.
२००८ मध्ये मुंबईत दहशतवादी हल्ला झाला होता. अजमल कसाब आणि पाकिस्तानातील त्याच्या इतर नऊ साथीदारांनी समुद्रमार्गे मुंबईत प्रवेश केला आणि शहर आणि देशाला हादरवून टाकणारा दहशतवादी हल्ला केला होता. “नौदल कोणताही धोका पत्करू शकत नाही आणि म्हणूनच ते सर्व स्थानिक बोटींवर लक्ष ठेवून आहेत. याचबरोबर दररोज त्यांच्या नोंदी आणि तपासणी करत आहेत. अशा प्रकारच्या दुर्दैवी घटनेचा धोका नेहमीच असतो आणि म्हणूनच बोटींची तपासणी आणि त्यांच्या नोदीं ठेवण्यात येत आहेत”, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करून ते उद्ध्वस्त केले. यानंतर पाकिस्तानने सातत्याने भारताच्या सीमेलगताच्या शहरांवर ड्रोनसह विविध माध्यमांतून हल्ले करण्याचे प्रयत्न केले. पण, भारतीय लष्कराने हे सर्व हल्ले परातवून लावले. दरम्यान काल दोन्ही देशांमध्ये शस्त्रविरामास मान्यता दिली आहे.