मुंबई : अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) केलेल्या कारवाईत ७५ किलो गांजा व ४८०० कोडीनच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणामागे आंतरराज्यीय टोळीचा सहभाग असून याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. जप्त अंमली पदार्थांची किंमत पावणे दोन कोटी रुपये आहे. उल्हासनगर परिसरात कोडीनच्या बाटल्यांची तस्करी होत असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत ४ हजार ८०० कोडीनच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी विनोद पी. याला अटक करण्यात आली. आरोपीचे साथीदार मनीष पी., आकाश पी., राज के., मोहनीश एस. आणि सनी जे. यांना भिवंडी परिसरातून ताब्यात घेण्यात आले. हेही वाचा.एनसीबीकडून ५२ कोटी रुपयांचे अमलीपदार्थ नष्ट त्यांच्या वाहनात ७५ किलो गांजा सापडला. याशिवाय अमली पदार्थांच्या विक्रीतून जमा केलेले रोख एक लाख १८ हजार रुपयेही हस्तगत करण्यात आले. याप्रकरणी अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.