मुंबई : मुंबईत अनेक खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये अनधिकृतरित्या अभ्यासक्रम सुरू असून महाविद्यालयांशी संगनमत करून अकरावी, बारावीसाठी इंटिग्रेटेड अभ्यासक्रम चालवले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला आहे. या प्रकरणांमध्ये लाखो रुपयांचे शुल्क घेतले जात असून ते बेकायदेशीर असल्याचाही दावा करण्यात आला आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांची भेट घेऊन संबंधित प्रकरणातील व्यक्तींवर तातडीने शासकीय कारवाई करण्याची मागणी केली आहे.
खाजगी कोचिंग क्लासमधील अभ्यासक्रमामुळे विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक शिक्षण आणि प्रयोगशाळा उपलब्ध होत नाही. शैक्षणिक निकषांनुसार त्या बाबी आवश्यक असतात. तसेच, या कोर्सेसमुळे विद्यार्थी व पालकांना अभ्यासाचा ताण सहन करावा लागतो. तासंतास चालणाऱ्या क्लासेसमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. तसेच, शासनाची कोणतीही अधिकृत मान्यता नसतानाही असे अभ्यासक्रम सर्रास सुरू असल्यामुळे शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
त्यामुळे मातेला यांनी गुरुवारी भुसे यांची भेट घेऊन या समस्येकडे त्यांचे लक्ष वेधले. दरम्यान, मुंबईतील सर्व इंटिग्रेटेड कोचिंग क्लासेसची चौकशी करावी, बनावट हजेरी दाखवणाऱ्या महाविद्यालयांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, शालेय शिक्षण संचालनालयामार्फत अशा अभ्यासक्रमांवर बंदी लागू करून विद्यार्थ्यांच्या हितासाठी धोरणात्मक निर्णय व नियमावली तयार करावी, या संपूर्ण व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करावी आदी मागण्या भुसे यांच्याकडे करण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांचे भविष्य, शिक्षणाची गुणवत्ता आणि पालकांचा विश्वास हे खाजगी शिकवणीच्या बेकायदेशीर व्यवसायात भरडले जात आहेत. शिक्षण ही सामाजिक जबाबदारी असून ती बाजारू नफा आणि बनावट व्यवस्थेला बळी पडता कामा नये. दादा भुसे यांनी या तक्रारीची गांभीर दखल घेतली असून लवकरच संबंधित विभागाला चौकशीचे आदेश देण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती अमोल मातेला यांनी दिली.