मुंबई : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठा ३९ टक्क्यांवर आला आहे. वातावरणातील उष्मा वाढू लागला असून हा पाणीसाठा जुलै अखेरीसपर्यंत पुरवावा लागणार आहे. मुंबईकरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागू नये म्हणून मुंबई महापालिकेने आधीच राज्य सरकारकडे राखीव साठ्याच्या वापरासाठी विनंती केली आहे. पाऊस लांबल्यास मुंबई महापालिकेला या राखीव साठ्याचा वापर करावा लागणार आहे.
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सातही धरणातील मिळून एकूण पाणीसाठा सध्या ३९.१५ टक्के आहे. सातही धरणांची पाणी साठवण्याची क्षमता १४लाख ४७ हजार दशलक्षलीटर इतकी आहे. त्यातुलनेत सध्या सात धरणात मिळून ५ लाख ६६ हजार ५९९ दशलक्षलीटर पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा गेल्यावर्षीपेक्षा जास्त असला तरी जुलै अखेरपर्यंत पाणीसाठा पुरवावा लागणार आहे.
गेल्यावर्षी याच दिवशी ३३ टक्के पाणीसाठा होता. तर त्या आधीच्यावर्षी हाच पाणीसाठा ४०.२१ टक्के होता. हा पाणीसाठा सध्या पुरेसा असला तरी प्रत्यक्षात मुंबईत अनेक ठिकाणी आतापासूनच पाण्याचा दाब कमी आहे. त्यामुळे मुंबईच्या अनेक भागात पाणी टंचाई भेडसावते आहे. तसेच उन्हाचा तापही वाढू लागला असल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवनही मोठ्या प्रमाणावर होत असते. मुंबईत जून महिन्यात पावसाला सुरुवात होत असली तरी प्रत्यक्षात धरणक्षेत्रात जोरदार पाऊस जुलै महिन्यात पडतो. धरणातील पाणीसाठा हा जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत पुरेल अशा पद्धतीने नियोजन केले जाते. मात्र तोपर्यंत पुरेसा पडला नाही तर मुंबईकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागू शकते.
सध्यातरी पाणी कपातीची आवश्यकता नाही पण पाणी कपातीची वेळ येऊ नये म्हणून दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई महापालिकेने राज्य सरकारकडे धरणातील राखीव पाणीसाठ्याची मागणी केली आहे.
अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त
किती पाण्याची मागणी
राज्य सरकारच्या मालकीच्या उर्ध्व वैतरणा आणि भातसा या दोन धरणातील राखीव साठ्याची मागणी करणारे विनंती पत्र मुंबई महानगरपालिकेने राज्य सरकारला पाठवले आहे. उर्ध्व वैतरणा धरणातून ६८ हजार दशलक्षलीटर तर भातसा धरणातून १ लाख १३ हजार दशलक्षलीटर राखीव साठ्याच्या पाण्याची मागणी या पत्राद्वारे मुंबई महापालिका प्रशासनाकडे नोंदवली आहे. गेल्यावर्षीही मुंबई महापालिकेने राखीव साठ्याची मागणी केली होती. जून २०२४ मध्ये पाणीसाठा ५ टक्क्यांपर्यंत खालावला होता. तेव्हा राखीव साठ्याचा वापर सुरू करण्यात आला होता. यंदाही मागणी केली असली तरी जेव्हा गरज लागेल तेव्हाच त्याचा वापर सुरू केला जाणार असल्याची माहिती पालिकेच्या जल अभियंता विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
कोणत्या धरणात किती पाणीसाठा
उर्ध्व वैतरणा …….४९.२२ टक्के
मोडक सागर …. २३.५२टक्के
तानसा …..३१.८० टक्के
मध्य वैतरणा ….. ४२.९८टक्के
भातसा …. ३८.६८ टक्के
विहार….५०.३७ टक्के
तुळशी ….४८.४५ टक्के