मुंबई : दिल्ली – मुंबई असा १५ तास ३२ मिनिटांत वेगवान प्रवास करणाऱ्या प्रतिष्ठित राजधानी एक्स्प्रेसला मंगळवार, १७ मे रोजी ५० वर्षे पूर्ण झाली. प्रथम डिझेल इंजिनावर धावणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसमध्ये कालांतराने बरेच बदल झाले. या मार्गावर रुळ अद्ययावत करण्याचे काम सुरू असून मार्च २०२४ नंतर प्रतितास १६० किलोमीटर वेगाने राजधानी धावेल, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजधानी एक्स्प्रेसला ५० वर्षे झाल्याचे औचित्य साधून मुख्य टपाल खात्याने मुंबई सेन्ट्रल येथे खास टपाल तिकिट प्रसिद्ध केले. तसेच केक कापून राजधानी एक्स्प्रेसचा वाढदिवस साजरा केला. यावेळी राजधानी एक्सप्रेसचे स्वारस्थ केलेल्या लोकोपायलट आणि काही कर्मचाऱ्यांनीही आपल्या भावनांना वाट मोकळी केली. १९८८ पर्यंत १२० किमी प्रतितास या गतीने चालणारी राजधानी एक्स्प्रेस सर्वात जलद गाडी होती. या गाडीने पूर्वी मुंबईहून दिल्लीला पोहोचण्यासाठी १९ तास लागत होते. आता हाच प्रवास १५ तास आणि ३२ मिनिटात होतो. या मार्गावर रुळ अद्ययावत करण्यात येत असून त्यासाठी विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे या मार्गावरील गाडय़ांचा वेगही वाढण्यास मदत होईल. मार्च २०२४ पर्यंत हे काम पूर्ण होईल आणि त्यानंतरच राजधानी एक्स्प्रेस प्रतितास १६० किलोमीटर वेगाने धावेल आणि मुंबईहून दिल्लीला १२ तासांमध्ये पोहोचणे शक्य होईल. राजधानी एक्स्प्रेसला येत्या काळात वंदे भारत रेल्वेचे डबे जोडण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai new delhi rajdhani express train completes 50 years of service zws
First published on: 18-05-2022 at 00:22 IST