scorecardresearch

मुंबईची नवी ओळख ‘वृक्ष नगरी’; संयुक्त राष्ट्रसंघाकडून बहुमान

उभारण्यात आलेली मियावाकी जंगले, नियमित करण्यात येणारे वृक्षारोपण, वृक्षांची शास्त्रशुद्ध पद्धतीने राखण्यात येणारी निगा, जनजागृती, संबंधित संसाधनांचे वाटप यांची दखल घेत संयुक्त राष्ट्र संघाच्या अखत्यारितील ‘अरबर डे फाऊंडेशन’ने ‘वृक्ष नगरी’चा बहुमान मुंबईला बहाल केला आहे.

मुंबई : उभारण्यात आलेली मियावाकी जंगले, नियमित करण्यात येणारे वृक्षारोपण, वृक्षांची शास्त्रशुद्ध पद्धतीने राखण्यात येणारी निगा, जनजागृती, संबंधित संसाधनांचे वाटप यांची दखल घेत संयुक्त राष्ट्र संघाच्या अखत्यारितील ‘अरबर डे फाऊंडेशन’ने ‘वृक्ष नगरी’चा बहुमान मुंबईला बहाल केला आहे. हा बहुमान मिळविणारी मुंबई भारतातील दुसरे शहर ठरली आहे.
मुंबईमधील वृक्षवल्लीमध्ये वाढ व्हावी या उद्देशाने गेल्या काही वर्षांपासून शहरातील विविध भागात मियावाकी जंगले उभारण्यात येत आहे. त्याचबरोबर नियमितपणे वृक्ष लागवडही करण्यात येत आहे. तसेच शास्त्रशुद्ध पद्धतीने झाडांची राखण्यात येणारी निगा, वृक्षसंपदेबाबत करण्यात येणारी जनजागृती, संबंधित संसाधनांचे वाटप आदींची दखल घेत ‘अरबर डे फाऊंडेशन’ने मुंबईची वृक्ष नगरी या बहुमानासाठी निवड केली.
विविध देशांमधील अनेक शहरांमधील वृक्षसंपदेशी संबंधित निकषांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर हा बहुमानासाठी मुंबईची निवड करण्यात आली. यापूर्वी भारतातील हैदराबाद शहराला हा बहुमान मिळाला आहे, अशी माहिती पालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या अखत्यारीतील ‘अरबर डे फाऊंडेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅन लेंब यांनी मुंबईला मिळालेल्या बहुमानाची माहिती विशेष पत्राद्वारे पालिकेला कळविली. या पत्रात त्यांनी मुंबईचे अभिनंदन केले आहे.
पालिका मुख्यालयात बुधवारी पार पडलेल्या एका विशेष बैठकीत उपस्थित असलेले पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ‘अरबर डे फाऊंडेशन’च्या पत्राची प्रत पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि परदेशी यांना दिली. तसेच उभयतांनी केलेल्या कामगिरीचे आदित्य ठाकरे यांनी कौतुक केले. अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प). पी. वेलरासू, संजीव कुमार, सुरेश काकाणी, सहआयुक्त अजित कुंभार, सहआयुक्त (मनपा आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, सहआयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत, उपायुक्त संजोग कबरे, अजय राठोर आदी मान्यवर उपस्थित होते.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mumbai new identity tree city honors united nations united nations amy

ताज्या बातम्या