मुंबई: आखाती देशातील युद्धामुळे भारतात इंधन विशेषत: एलपीजी गॅस सिलिंडर तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे गंभीर संकट येत्या काळात सर्वसामान्यांसमोर उभे राहणार आहे. त्यामुळे एलपीजी तुटवड्याच्या या संकटावर चर्चा करण्यासाठी मुंबई महापालिकेची एक विशेष सभा बोलवावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
इस्रायल आणि इराण युद्धामुळे देशभरात इंधन तुटवडा निर्माण झाला आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्यामुळे उपाहारगृहे बंद करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या विषयावर मुंबई महापालिकेने पुढाकार घेऊन तातडीच्या उपाययोजना कराव्या व त्याकरीता एक विशेष सभा बोलवावी, अशी मागणी काँग्रेसचे गटनेते अश्रफ आझमी यांनी केली.
अश्रफ आझमी यांनी महापौर रितू तावडे यांना पत्र पाठवून विशेष सभेची मागणी केली आहे. आझमी यांनी मुंबईत सुरू असलेल्या एलपीजी गॅस तुटवडा संकटाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. या संकटामुळे शहरातील अत्यावश्यक सेवा आणि सर्वसामान्य नागरिक प्रभावित होत आहेत. आझमी यांनी म्हटले आहे की, एलपीजी सिलिंडरच्या तुटवड्यामुळे अनेक उपाहारगृहे आणि लहान खाद्य व्यवसाय बंद पडण्याच्या स्थितीत आले आहेत. ज्यामुळे हजारो कामगारांच्या उपजीविकेवर परिणाम होत आहे. तसेच सुमारे ७.५ लाख शालेय विद्यार्थ्यांना अन्न पुरवणाऱ्या महानगरपालिकेच्या मध्यान्ह भोजन योजनेवरही याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
याशिवाय मुंबईतील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांनाही दैनंदिन स्वयंपाकासाठी एलपीजी सिलिंडर मिळविण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे याबाबत उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे मत आझमी यांनी व्यक्त केले आहे.
आझमी यांनी पत्रामध्ये तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी केली :
• एलपीजी पुरवठा संकटावर चर्चा करण्यासाठी महानगरपालिकेची विशेष सभा बोलावावी.
• मुंबईतील एलपीजी उपलब्धता आणि पुरवठ्याबाबत महानगरपालिका आयुक्तांनी सविस्तर अहवाल सादर करावा.
• शाळा, रुग्णालये आणि घरगुती वापरासाठी अखंड एलपीजी पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक असल्यास आपात्कालिन व्यवस्थापन कायदा २००५ लागू करावा.
