Latest News in Mumbai Today : मुंबईतील घडमोडींकडे राज्यासह देशाचं लक्ष लागून राहिलेलं असतं. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून बॉलीवुडसाठीही मुंबईची एक वेगळी ओळख आहे. तेव्हा राजकीय घडामोडी, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी, वाहतूकीचे अपडेट्स, गुन्हे क्षेत्रातील बातम्या, आर्थिक घडामोडी, नागरी समस्या याबाबतच्या घडामोडींची माहिती या blog च्या माध्यमातून जाणून घेता येईल…
Mumbai Maharashtra News LIVE Today, 06 March 2025
महाराष्ट्राचे अवकाश धोरण तयार करण्यासाठी प्रयत्नशील – देवेंद्र फडणवीस
मुंबई : ‘अवकाश तंत्रज्ञान दैनंदिन जीवनाचा भाग बनत आहे. खाजगी क्षेत्राचा सहभाग व्हावा व भारताने जागतिक अवकाश क्षेत्रात आठ ते दहा टक्के वाटा उचलून ४४ दशलक्ष डॉलरचा व्यवसाय निर्माण व्हावा म्हणून पंतप्रधानांनी धोरण आखले आहे. सध्या या क्षेत्रात १८९ स्टार्टअप्स असून १२४ दशलक्ष डॉलरची गुंतवणूक येत आहे. अवकाश तंत्रज्ञानासोबत कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान (एआय) ही उत्तम जोडी आहे. भविष्यात आम्ही महाराष्ट्रासाठी अवकाश धोरण तयार करण्याचा प्रयत्न करू’, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे आयोजित परिषदेत सांगितले.
मढ आयलॅण्ड परिसरातील अनधिकृत इमारतीवर पालिकेचा हातोडा
मुंबई : महानगरपालिकेच्या पी उत्तर विभागाच्या हद्दीतील मढ आयलॅण्ड परिसरातील दारणे हाऊस (ख्रिश्चन पाडा) येथे अनधिकृतरित्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते. ही बाब लक्षात येताच महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने गुरुवारी कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईत अनधिकृत इमारतीच्या तळ मजल्यासह वरील तीन मजले जमीनदोस्त करण्यात आले.
परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा जुलैमध्ये होण्याची शक्यता, पात्रता प्रमाणपत्रासाठी १० मार्चपासून अर्ज करता येणार
मुंबई : परदेशामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतामध्ये वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा (एफएमजीई) देणे बंधनकारक आहे. ही परीक्षा जुलै २०२५ मध्ये होण्याची शक्यता आहे.
नालेसफाईच्या वादात आता मनसेची उडी, मिठी नदीतील गाळ काढण्याच्या निविदेत घोटाळा – मनसेचा आरोप
मुंबई : मुंबईतील मोठे नाले व मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी मुंबई महापालिकेने काढलेल्या निविदा प्रक्रियेत घोटाळा झाला असल्याचा आरोप मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केला आहे.
आरोग्य विभागातील ८०० वैद्यकीय अधिकारी २७ वर्षे पदोन्नतीपासून वंचित!
मुंबई : आरोग्य विभागात ‘गट ब’ मधील पदांवर कार्यरत असलेल्या जवळपास ८०० वैद्यकीय अधिकाऱ्यांना सरकारने मागील अनेक वर्षांपासून पदोन्नती दिलेली नाही. यातील अनेक अधिकारी पदोन्नतीशिवायच निवृत्त झाले असून आरोग्य विभागातील ‘सनदी बाबू’ नेमके काम काय करतात, असा सवाल या डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.
मुंबई : माटुंग्यातील अनधिकृत दुकानांवर महापालिकेची कारवाई, ५२ दुकाने जमीनदोस्त
मुंबई : माटुंगा रेल्वे स्थानक आणि भांडारकर मार्गावरील फुल बाजार परिसरातील ५२ अनधिकृत दुकानांवर महानगरपालिकेच्या एफ उत्तर विभागाने गुरुवारी निष्कासनाची कारवाई केली.
अग्निशमन सेवा क्रीडा संमेलनात मुंबई अग्निशमन दलाची बाजी, राष्ट्रीय स्पर्धेत ४४ पदके पटकावली, २० सुवर्ण पदकांचा समावेश
मुंबई : मुंबईकरांसाठी सतत तत्पर असणाऱ्या मुंबई अग्निशमन दलाने नवी दिल्ली येथे आयोजित अखिल भारतीय अग्निशमन सेवा क्रीडा संमेलनात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या क्रीडा संमेलनात क्रीडा आणि अग्निशमन कवायत स्पर्धांमध्ये मुंबई अग्निशमन दलाने तब्बल ४४ पदके पटकावली. त्यात २० सुवर्ण पदकांचा समावेश आहे.
मध्य रेल्वेत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा, महाव्यवस्थापकांनी केला महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान
मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मध्य रेल्वेमध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सेंट्रल स्टाफ बेनिफिट फंडतर्फे (सीएसबीएफ) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मध्य रेल्वेमधील महिला कर्मचाऱ्यांचा मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्म वीर मीना यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मुंबई – मडगाव विशेष रेल्वे धावणार, पनवेल – चिपळूणदरम्यान मेमू
मुंबई : होळीनिमित्त रेल्वेने कोकणात जाणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने, गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. गर्दी विभाजित करण्यासाठी मुंबई – मडगाव विशेष रेल्वेगाड्या, पनवेल-चिपळूण मेमू धावणार आहे.
विनातिकीट प्रवाशांकडून १३४ कोटी रुपये दंड वसूल
मुंबई : विनातिकीट प्रवाशांच्या मुसक्या आवळण्यासाठी पश्चिम रेल्वेवरील मुंबई उपनगरीय रेल्वे सेवा, लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्या, प्रवासी रेल्वेगाड्या आणि सुट्टीकालीन विशेष रेल्वे गाड्यांमध्ये नियमित तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.
Raj Thackeray Post: भय्याजी जोशींच्या विधानावर राज ठाकरेंचं टीकास्र; म्हणाले, “या असल्या काड्या घालून…”
Raj Thackeray Targets Bhayyaji Joshi Statement: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते व माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी केलेल्या एका विधानाची सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. भय्याजी जोशी यांनी मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना मराठी भाषेबाबत एक विधान केलं. त्यावरून राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाला असून थेट विधिमंडळ अधिवेशनात याचे पडसाद उमटले.
मुंबई : केईएम रुग्णालयात सहा वर्षांत १ हजार १७६ अर्भकांचा मृत्यू
मुंबई : केईएम रुग्णालयामध्ये २०१९ पासून २०२४ पर्यंत १ हजार १७६ अर्भकांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. केईएममध्ये मुंबईसह आसपासच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात गर्भवती महिला प्रसूतीसाठी येत असतात. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात अर्भकांचा मृत्यू होणे ही गंभीर बाब असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
वैद्यकीय महाविद्यालयांतील डॉक्टरांना ॲप्रन बंधनकारक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे निर्देश
मुंबई : वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर ॲप्रन घालत नसल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना नेमका डॉक्टर कोण आहे हे लक्षात येत नाही. त्यामुळे अनेकदा अनुचित घटना घडण्याचे प्रकार होतात. या घटना रोखण्यासाठी, तसेच डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचारी यांच्यातील फरक रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या लक्षात यावा यासाठी वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व डॉक्टरांना पांढऱ्या रंगाचा ॲप्रन घालणे बंधनकारक असल्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने दिले.
सविस्तर वाचा....
धर्मादाय रुग्णालयात राखीव खाटांची माहिती दर्शनी भागात प्रदर्शित करा, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे निर्देश
मुंबई : धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब रूग्णांसाठी लागू असलेल्या सवलतींची माहिती दर्शनी भागात प्रदर्शित करण्याच्या नियमाची अंमलबजावणी करावी. तसेच राखीव रुग्णशय्यांची आकडेवारी डिजीटल व अद्ययावत स्वरुपात दर्शनी भागात लावावी. तक्रार निवारण आणि रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी धर्मादाय विभागाच्या अधिकाऱ्यांचा संपर्क क्रमांकही उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिले.
… अखेर साठ वर्षांपासूचा प्रश्न सुटणार, मोतीलाल नगरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
मुंबई : गोरेगाव येथील सुमारे १४३ एकर जमिनीवरील मोतीलाल नगरचा पुनर्विकास खासगी विकासक कंपनीमार्फत करण्याची म्हाडाने केलेली मागणी उच्च न्यायालयाने गुरूवारी मान्य केली. त्यामुळे, गेल्या सहा दशकांपासून रखडेला मोतीलाल नगरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. म्हाडाने यापूर्वीच तांत्रिक निविदा उघडली होती. न्यायालयाच्या या निर्णयामुळे वित्तीय निविदा उघडण्याचा आणि प्रकल्प राबवण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.
अदानी समुहाच्या आणखी एका प्रकल्पाला हिरवा कंदील
मुंबई : रायगड जिल्ह्यातील अंबा नदीकाठी प्रस्तावित असलेल्या जेट्टी प्रकल्पासाठी १५८ कांदळवने तोडण्यास उच्च न्यायालयाने बुधवारी अदानी सिमेंटेशन लिमिटेडला परवानगी दिली. तथापि, प्रकल्पासाठी कांदळवने तोडण्याची परवानगी देताना न्यायालयाने विकास आणि पर्यावरण संवर्धनाचे संतुलन राखण्याचे महत्त्व अधोरेखित केले व प्रकल्पासाठी विविध प्राधिकरणांनी लादलेल्या अटींचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश कंपनीला दिले.
द्वेषपूर्ण भाषणाचे प्रकरण :भाजपचे माजी प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्यावर खटला नाही
मुंबई : मुस्लिम समुदायाविरुद्ध ''द्वेषपूर्ण भाषण केल्याप्रकरणी भाजपचे माजी प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्यावर खटला दाखल करण्यास राज्याच्या गृह विभागाने परवानगी नाकारली आहे, अशी माहिती राज्य सरकारने बुधवारी उच्च न्यायालयात दिली. पावसकर यांच्यावर या प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते.
Mumbai Crime : धक्कादायक! मुंबईत १२ वर्षांच्या शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार, पाच जणांना पोलिसांनी केली अटक
Mumbai Crime : मुंबईत १२ वर्षांच्या शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी काका आणि त्यांच्या कुटुंबासह राहात होती. २४ फेब्रुवारीला शाळा सुटल्यापासून ती बेपत्ता होती. २६ फेब्रुवारीला मुलीच्या काकांनी मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार पोलिसात केली.
अक्षय शिंदे चकमक प्रकरण : पोलिसांना दिलासा देणाऱ्या ठाणे सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान
मुंबई : अक्षय याच्या कोठडी मृत्यूसाठी पाच पोलिसांना जबाबदार ठरवण्याच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या चौकशी अहवालाला स्थगिती देण्याच्या ठाणे सत्र न्यायालयाच्या निर्णयाला राज्य सरकारने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ठाणे न्यायालयाच्या आदेशाबाबत उच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त करून ताशेरे ओढल्यानंतर सरकारने हे अपील दाखल केले.
ऑरेंज गेट -मरीन ड्राईव्ह बोगदा प्रकल्प :भुयारीकरण सप्टेंबरपासून, ‘मावळा’ होतोय सज्ज
मुंबई : चेंबूर – मरीन ड्राईव्ह प्रवास अतिजलद करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्हदरम्यान दुहेरी बोगदा बांधण्याचा निर्णय घेतला असून या बोगद्यासाठी ऑरेंज गेट येथे लाॅन्चिंग शाफ्ट बांधण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
दक्षिण मुंबईतील भूमिगत यांत्रिकी वाहनतळाचे काम सुरू, हुतात्मा चौकातील फ्लोरा फाऊंटन समोर वाहनतळ
मुंबई : मुंबईत वाहनांची संख्या वाढत असून वाहनतळांची संख्या कमी पडू लागली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने मुंबईत चार ठिकाणी भूमिगत बहुस्तरीय यांत्रिकी (मल्टिलेवल रोबोटिक) वाहनतळ उभारण्याचे ठरवले आहे. त्यापैकी हुतात्मा चौकातील अप्सरा पेन शॉपजवळील भूमिगत बहुस्तरीय यांत्रिकी सार्वजनिक भूमिगत वाहनतळाचे काम सुरू झाले आहे.
किनारा मार्ग परिसरात हेलिपॅडसाठी चाचपणी
मुंबई : सागरी किनारा मार्ग परिसरात हेलिपॅड तयार करता येईल का याबाबत मुंबई महापालिका आता चाचपणी करणार आहे. मंगळवारी राज्य सरकारने पालिकेच्या विविध प्रकल्पांचा आढावा घेतला त्यावेळी हेलिपॅडबाबतची सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला केली होती. त्यानुसार याबाबतची व्यवहार्यता तपासण्यासाठी पालिका प्रशासन आता सल्लागार नेमणार आहे.
मुंबई न्यूज लाईव्ह अपडेट्स