scorecardresearch

Premium

संक्षिप्त : ‘आजीच्या नातवा’कडून पोलिसांची दमछाक

एका शालेय विद्यार्थ्यांच्या मस्करीने पोलिसांना चांगलेच दमवले. या मुलाने एका वाहनात बॉम्ब असल्याचा दूरध्वनी नियंत्रण कक्षात केला होता.

एका शालेय विद्यार्थ्यांच्या मस्करीने पोलिसांना चांगलेच दमवले. या मुलाने एका वाहनात बॉम्ब असल्याचा दूरध्वनी नियंत्रण कक्षात केला होता. हे वाहन शोधण्यासाठी पोलिसांची सारी यंत्रणा कामाला लागली. अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी ही मोटार शोधली. पण ती अफवा असल्याचे निष्पन्न झाले. घाटकोपरच्या भटवाडी येथील गार्डन क्रमांक २ मध्ये गुरुवारी संध्याकाळी हा प्रकार घडला. भटवाडी परिसरात एक वाहन उभे असून त्यात बॉम्ब ठेवला असल्याचे या दूरध्वनी करणाऱ्याने ४ वाजता पोलिसांच्या नियंत्रण कक्षास सांगितले आणि वाहनाचा क्रमांकही दिला. त्यामुळे घाटकोपर पोलीस, श्वानपथक, बॉम्ब शोधक आणि बॉम्ब नाशक पथक घटनास्थळी रवाना झाले. परिसर पिंजून काढल्यानंतर पोलिसांना ते वाहन सापडले. परंतु ते एका पोलीस अधिकाऱ्याचे असल्याचे निष्पन्न झाले. अर्थात बॉम्ब असल्याची अफवाच होती. तेव्हा त्या क्रमांकाचा पत्ता पोलिसांनी शोधून काढला. तो एका वृद्ध महिलेचा होता. तिच्या नकळत तिच्या ८ वीत शिकणाऱ्या १४ वर्षीय नातवाने घेतला आणि हा प्रताप केला होता. त्याला समज देऊन सोडून दिल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजाराम व्हनमाने म्हणाले.

बनावट नोटांसह दोघांना अटक
नवी मुंबई : बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी एपीएमसी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून २ लाख ६४ हजार ५०० रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. एपीएमसी आवारात बनावट नोटा चलनात वापरल्या जात असल्याची तसेच गुरुवारी काही व्यक्ती अशा नोटा घेवून येणार असल्याची माहिती एपीएमसी पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे त्यांनी भाजी मार्केट येथील बस थांब्यालगत सापळा रचला. यावेळी मोटार सायकलवर तेथे दोन व्यक्ती आल्या. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन झाडती घेतली. यावेळी त्यांच्याकडे ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा आढळल्या.  या नोटा तपासल्यानंतर, पोलिसांनी जॉनी शेख आणि सनाउल शेख या दोघांना अटक केली. त्यांच्यावर एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना बनावट नोटा पुरवणाऱ्याचा शोध सुरु असल्याचे पोलिस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले व या नोटा प. बंगाल येथून येत असाव्यात अशी शक्यता वर्तवली.

मतदार जागृतीसाठी  आमीर खानचा पुढाकार !
मुंबई : निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा म्हणून मतदारांमध्ये जनजागृती करण्याचे काम चित्रपट अभिनेता आमीर खान करणार आहे.निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोगाच्या वतीने विविध जाहिराती करण्यात येणार आहेत. मतदारांना आकर्षित करण्याकरिता निवडणूक आयोग सेलिब्रेटीच्या शोधात होता. यासाठी चित्रपट अभिनेता अमिर खान याच्याकडे विचारणा करण्यात आली होती. अमिर खान त्याला होकार दिला असून, मतदारांमध्ये जनजागृतीसाठी पुढाकार घेण्यासाठी जाहिराती करण्याचे मान्य केले आहे. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, महेंद्रसिंग धोनी, बॅडिमटनपटू सायना नेहवाल आणि मृष्टीयोद्धी मेरीकॉम आदी मान्यवरही मतदारांमध्ये जनजागृती करणार आहेत.

अभियांत्रिकीचा निकाल जाहीर
मुंबई : मुंबई विद्यापीठाने एप्रिल महिन्यात घेतलेल्या अभियांत्रिकीच्या पहिल्या सत्राच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून तो ३६.३४ टक्के लागला आहे. यंदा प्रथमच या परीक्षेच्या पेपर तपासणीचे काम पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आले होते. अभियांत्रिकी परीक्षेच्या निकालाचे काम पूर्ण होण्यासाठी नियोजित वेळेपेक्षा उशीर झाल्याने विद्यार्थी संघटनांनी आवाज उठविला होता. यानंतर ताबडतोब दुसऱ्या दिवशी जुन्या अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर झाला. श्रेयांक आणि गुणांक पद्धतीच्या नवीन अभ्यासक्रमाच्या पहिल्या सत्राचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेला २९५६५ विद्यार्थी बसले होते. यातील १०२४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर १७९५० विद्यार्थी नापास झाले आहेत. निकाल विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.

वयोवृद्ध पुजाऱ्याची  दगडाने ठेचून हत्या
मुंबई : दहिसर येथील वागेश्वरी मंदिराच्या पुजाऱ्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. रवीदत्त पुरी ऊर्फ  बाबा रोहिदास महाराज (९५) असे या पुजाऱ्याचे नाव आहे.रवीदत्त पुरी गेल्या ४० वर्षांपासून या मंदिरात राहत होते. त्यांनीच हे मंदिर बांधले आहे. तेच या मंदिराची देखभाल करायचे. काही वर्षांपूर्वी अन्य एक महाराज या मंदिरात राहण्यासाठी आले होते. मात्र गेल्या चार दिवसांपासून ते या ठिकाणी दिसले नाहीत. त्यांच्यावर हत्येचा संशय आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. जागेच्या वादातून अथवा मंदिर बळकावण्याच्या उद्देशाने ही हत्या झाल्याचा संशय आहे.

सिडकोच्या मुख्य  दक्षता अधिकारीपदी डॉ. प्रज्ञा सरवदे
नवी मुंबई : सिडको महामंडळाच्या मुख्य दक्षता अधिकारीपदी राज्याच्या विशेष पोलीस महासंचालक डॉ. प्रज्ञा सरवदे यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी शुक्रवारी मुंबईतील सिडकोच्या कार्यालयात मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर यांच्याकडून पदभार स्वीकारला. सिडकोच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला हा स्वतंत्र पदभार देण्यात आला आहे.  सिडकोत वादग्रस्त ठरणाऱ्या अनेक प्रकरणांची चौकशी करता यावी यासाठी पोलीस दलातील उच्च अधिकारी दक्षता विभागाच्या प्रमुखपदी असावा, अशी मागणी व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी शासनाकडे केली होती. त्यानुसार भारतीय पोलीस सेवेच्या १९८९ च्या तुकडीतील सनदी अधिकारी असलेल्या डॉ. सरवदे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.   

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mumbai news mumbai newslatest mumbai news breaking news of mumbai

First published on: 08-03-2014 at 12:01 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×