scorecardresearch

Premium

मालमत्ता करवसुलीसाठी ‘सुखदा-शुभदा’ला नोटीस

राजकारण्यांची निवासस्थाने असलेल्या वरळीच्या सुखदा आणि शुभदा इमारतींमधील रहिवाशांनी १६ कोटी रुपये मालमत्ता कर थकविला असून महापालिकेने या सोसायटय़ांवर नोटिसा बजावल्या आहेत.

राजकारण्यांची निवासस्थाने असलेल्या वरळीच्या सुखदा आणि शुभदा इमारतींमधील रहिवाशांनी १६ कोटी रुपये मालमत्ता कर थकविला असून महापालिकेने या सोसायटय़ांवर नोटिसा बजावल्या आहेत. येत्या २१ दिवसांमध्ये मालमत्ता कराची थकबाकी न भरल्यास जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.
सुखदा सोसायटीमधील एका विंगमधील रहिवाशांनी २ कोटी ३७ लाख ६९ हजार २०९ रुपये, तर दुसऱ्या विंगमधील रहिवाशांनी २ कोटी, ४ लाख ७१ हजार १४१ रुपये; तर शुभदा सोसायटीतील एका विंगमधील रहिवाशांनी ९ कोटी ३८ लाख ४४ हजार २५९, तर दुसऱ्या विंगमधील रहिवाशांनी २ कोटी ५६ लाख ३६ हजार २६२ रुपये मालमत्ता कर थकविला आहे. २००६ पासून थकलेल्या १६ कोटी ३७ लाख २० हजार ८७१ रुपये मालमत्ता कराचा २१ दिवसांमध्ये भरणा करण्याची नोटीस पालिकेने सोसायटय़ांवर बजावली आहे.  नियोजित मुदतीमध्ये थकबाकी भरण्यात आली नाही तर कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

मलनि:सारण वाहिन्यांसाठी ‘जेएनएनयूआरएम’ निधीचा वापर
मुंबई : मुंबईमधील मलजल वाहून नेणाऱ्या मलनि:सारण वाहिन्यांचे जाळे अधिक सक्षम करण्यासाठी महापालिका आठ प्रकल्प हाती घेणार असून त्यासाठी २०४७.३७ कोटी रुपये खर्च येणार आहे. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुनरुत्थान अभियानाअंतर्गत (जेएनएनयूआरएम) मिळणाऱ्या निधीतून प्रकल्पखर्च भागविण्यात येणार आहे. त्यासाठी स्थायी समितीची, पालिका सभागृहाची मंजुरी घ्यावी लागेल. मलजल बोगद्याचा आराखडा तयार करणे, कार्यान्वित करणे यासाठी ३८ कोटी रुपये, वर्सोवा अंतर्गामी उदंचन केंद्र (२३७ कोटी) वर्सोवा मलजल प्रक्रिया केंद्र (३७१.८० कोटी), मालाड अंतर्गामी उदंचन केंद्र (३२८ कोटी), बहिर्गामी उदंचन केंद्रातून पातमुखाकडे जाणारा बोगदा (१६९.१३ कोटी), भांडुप प्रक्रिया केंद्र (३६५.४४ कोटी), मालाड प्राधान्य मलनि:सारण बोगदा (१७०कोटी) रुपये खर्च अपेक्षित आहे.

लुटारूंची टोळी अटकेत
मुंबई : महामार्गावर वाहनचालकांना लुटणाऱ्या पाच जणांच्या टोळीला पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. या टोळीने बुधवारी एका व्यापाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवून लुटले होते. विनोदकुमार टेकरीवाल (६०) हे स्विफ्ट गाडीने मालाडला निघाले होते. पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाकोला पुलाजवळ पाच तरुणांनी त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवत सोनसाखळी चोरून नेली. याबाबत तपास करून अंधेरी गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांनी गाडीच्या क्रमांकावरून शोध घेऊन आरोपींची माहिती मिळवली. धारावीच्या मदिना हॉटेल येथे वरिष्ठ निरीक्षक दीपक फटांगरे यांच्या नेतृत्वाखाली ज्योत्स्ना रासम, राजू कसबे, सुनील माने, संजय मोरे, हरिश्चंद्र राठोड, हनुंमत जोशी आणि मधुकर पाटील यांच्या पथकाने सापळा रचून या टोळीला अटक केली.

लाचखोर गणेश बोराडेला जामीन
कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिकेचा लाचखोर साहाय्यक आयुक्त गणेश बोराडे व त्याचा साथीदार कय्यूम शेख यांना कल्याण न्यायालयाने प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या जामीनावर शुक्रवारी मुक्त केले.
गेल्या आठवडय़ात बोराडे व त्याचा साथीदार शेख यांना एका व्यापाऱ्याकडून तीन लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली होती. न्यायालयाने आरोपींचे वकील व सरकारी वकिल दीपक तरे यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आरोपींना जामीन मंजूर केला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विवेक जोशी यांनी सांगितले की,  आरोपींना जामीन दिल्यास ते साक्षीदारांना फोडतील किंवा त्यांना त्रास देतील म्हणून त्यांना जामीन देऊ नये अशी मागणी न्यायालयात केली आहे.

तळोजा कारागृहात आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न
पनवेल : उरण येथील तिहेरी हत्याकांडातील आरोपी विलास रामगडे (वय ३७) याने तळोजा तुरुंगात गुरुवारी मध्यरात्री आत्महत्येचा प्रयत्न केला.
दोन आठवडय़ांपुर्वी विलासने गर्भवती पत्नी आणि भावजयची निर्घुण हत्या केली होती. न्यायालयाने त्याला कोठडी सूनावल्यानंतर तो तळोजा तुरूंगात होता. मोलमजूरी करणारा विलासला तुरूंगात असताना पश्च्याताप झाल्याचे पोलीसांना विलासने दिलेल्या जबाबात म्हटले आहे.
विलासने चादरीच्या सहाय्याने बॅरेकमधील बाथरुमच्या लोखंडी गजाला गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. बॅरेकमधील शेजारील कैद्याने हा प्रकार पाहील्यानंतर आरडाओरड केला. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.
या अगोदर तळोजा तुरूंगात २३ जानेवारीला पंकज अवध नारायणसिंग (वय २७) यानेही आत्महत्या केली होती.

सहाव्या मजल्यावरून पडून मोलकरणीचा मृत्यू
ठाणे : घोडबंदर येथील हिरानंदानी इस्टेटमधील हिलग्रेंज सोसायटीच्या सहाव्या मजल्यावरून पडून डॉली मंडळ (१९, रा. पातलीपाडा) या मोलकरणीचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी दुपारी घडली. हिलग्रेंज या सोसायटीतील सहाव्या मजल्यावर राहणाऱ्या अंकुश ठाकरे यांच्याकडे डॉली घरकाम करीत होती. गुरूवारी दुपारी घरात कोणीही नव्हते. त्यावेळी खिडकीत कपडे वाळत घालण्याचे काम करीत असताना तोल गेल्याने ती खाली पडली. त्यात तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

अनुह्य़ा प्रकरणी माहिती देणाऱ्यास ५ लाखांचे इनाम
मुंबई : कुर्ला टर्मिनस येथून बेपत्ता झालेली इस्थर अनुह्य़ाविषयी माहिती देणाऱ्यास पाच लाख रुपयांचे पारितोषिक देण्याची घोषणा आज पोलिसांकडून करण्यात आली. ज्या दिवशी इस्थर कुर्ला टर्मिनस येथे आढळून आली त्यावेळी तेथे हजर असलेल्या प्रवाशांपैकी कुणीतरी पुढे यावे आणि माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्यास इनाम देण्याची घोषणाही पोलिसांकडून करण्यात आली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mumbai news news in mumbai mumbai city news

First published on: 08-02-2014 at 02:46 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×