तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांच्या रखडलेल्या शिष्यवृत्तीची मागणी करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या छात्रभारतीच्या ३५ विद्यार्थ्यांना शुक्रवारी मलबार हिल पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयात हजर केले असता पाच विद्यार्थ्यांनी सरकारचा निषेध म्हणून जामीन घेण्याचे नाकारले. त्यांना न्यायालयाने सात दिवसांची कोठडी सुनावली आहे.
‘अभियांत्रिकी पदविके’च्या दुसऱ्या वर्षांला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची २०१२-१३ या शैक्षणिक वर्षांची शिष्यवृत्ती सरकारच्या लालफितीच्या कारभारामुळे रखडली असल्याचा या विद्यार्थ्यांचा आरोप आहे. शिष्यवृत्तीची मागणी करण्यासाठी हे विद्यार्थी काही महिने सरकार दरबारी खेटे घालीत आहेत. त्यासाठी सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे व उच्च-तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन त्यांनी आपली कैफियत मांडली. मात्र न्याय न मिळाल्यामुळे छात्रभारतीच्या नेतृत्त्वाखाली विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. शिष्यवृत्ती तात्काळ मिळाली नाही तर कोठडीतच आमरण उपोषण करू, असा इशारा कोठडीत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिला आहे.

विद्यापीठात चीनकडून मार्शल आर्ट्सचे धडे?
मुंबई : चीनतर्फे मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांना मार्शल आर्ट्सचे धडे देण्याचा विचार सुरू आहे. चीनचे मुंबईतील वाणिज्यदूत डॉ. लिऊ यौफा यांनी राज्यपाल के. शंकरानारायणन यांची शुक्रवारी राजभवन येथे भेट घेतली. त्यावेळेस त्यांनी ही माहिती दिली. चिनी संस्कृतीची ओळख करून देणारे अनेक उपक्रम चीनतर्फे मुंबई विद्यापीठात सुरू झाले आहेत. त्यांचाच एक भाग म्हणून गेल्या वर्षी विद्यापीठात ‘कन्फ्युशिअस इन्स्टिटय़ूट’ सुरू करण्यात आली. आता मार्शल आर्ट्सचे धडे देण्याचा चीनचा विचार आहे. यातून युवकांना स्वसंरक्षणाचे धडे मिळतील, अशी अपेक्षा डॉ. यौफा यांनी व्यक्त केली. शैक्षणिक देवाणघेवाण वाढविण्याच्या दृष्टीने चीनने यंदा विद्यापीठातील १० विद्यार्थ्यांना चीनी विद्यापीठांमध्ये पाठविले होते. नाशिक येथे २००० एकर परिसरात २०-२० कंपन्यांची एक भव्य औद्यागिक वसाहत उभारण्याचा चीनचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले.

लाचखोर पोलिसाला अटक
ठाणे : ठाणे ग्रामीणमधील मनोर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यादव बापु भगत (५८) यास पाचशे रुपयांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी रंगेहाथ पकडले आहे.  मनोर पोलिसांनी एका भांडणामध्ये तक्रारदाराची मोटारसायकल जप्त केली होती. ती परत देण्यासाठी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यादव याने तक्रारदारकडे दोन हजारांची लाच मागितली होती.
या प्रकरणी तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार, मनोर येथील टेननाका पोलीस चौकीजवळ पथकाने सापळा रचून यादव यास पाचशे रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले.

एक कोटी १० लाखांचे अमलीपदार्थ जप्त
मुंबई : चीन आणि दक्षिण आफ्रिकेला पाठविण्यात येत असलेले कोकीन आणि केटामाईन या अमलीपदार्थाचा एक कोटी १० लाख रुपये किमतीचा मोठा साठा सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केला.
कुरिअर कंपनीच्या माध्यमातून विदेशामध्ये अंमलीपदार्थ पाठविण्यात येणार असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार सीमाशुल्क विभागाने दक्षिण मुंबईमधील एका कुरिअर कंपनीत धाड टाकून सुमारे १० लाख रुपये किमतीचे २.७ किलोग्रॅम केटामाईन आणि एक कोटी रुपयांचे २०० ग्रॅम हेरॉइन जप्त केले. दोन वेगवेगळ्या पार्सलमध्ये हे अमलीपदार्थ लपवून ठेवण्यात आले होते. केटामाईन चीनमध्ये, तर हेरॉइन दक्षिण आफ्रिकेमध्ये पाठविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मनसे नगरसेवकाच्या श्रीमुखात भडकविणाऱ्यास मारहाण
मुंबई : स्वपक्षाच्या नगरसेवकाच्या श्रीमुखात भडकविणाऱ्या नगरसेविकेच्या सचिवाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी बेदम मारहाण केली. केईएम रुग्णालयात उपचार केल्यानंतर सचिवाला घरी सोडून देण्यात आले. मनसेचे नगरसेवक संतोष धुरी आणि नगरसेविका सीमा शिवलकर यांचे सचिव संतोष साळसकर यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून खटके उडत होते. आपल्या विभागात हस्तक्षेप करणाऱ्या साळसकरला भेटण्यासाठी धुरी यांनी जी-दक्षिण विभाग कार्यालयात बोलावले होते. या भेटीदरम्यान उभयतांमध्ये शाब्दीक चकमक उडाली आणि त्याचे पर्यवसन हाणामारीत झाले. साळसकर यांनी धुरी यांच्या श्रीमुखात भडकवली. यामुळे संतप्त झालेल्या धुरी यांच्या समर्थकांनी साळसकर यांना बेदम मारहाण केली.

श्रीकर परदेशी यांच्या बदलीविरोधात याचिका
मुंबई : पिंपरी-चिंचवड पालिकेचे आयुक्त श्रीकर परदेशी यांची तडकाफडकी बदली करण्याच्या आदेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात शुक्रवारी जनहित याचिका करण्यात आली. उच्च न्यायालयानेही याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. राजकीय हितसंबंध असलेल्या व्यावसायिकांच्या बेकायदा बांधकामांविरुद्ध परदेशी यांनी मोहीम सुरू केली होती. त्याचमुळे नियम धाब्यावर बसवून त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली, असा आरोप याचिकाकर्ते बलबीर सिंग छाबरा यांनी केला आहे. जनहित डावलून केवळ राजकीय हितसंबंध जपण्यासाठीच त्यांची बदली करण्यात आल्याचा आरोपही याचिकेत केला आहे. पिंपरी-चिंचवडचे लोक परदेशी यांच्या कामाप्रती समाधानी होते. परंतु त्यांच्याकडून चांगले काम होत असतानाच त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याचे याचिकाकर्त्यांने नमूद केले आहे.