मुंबई: मुंबईतील राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या (एनटीसी) बंद गिरण्यांमधील ५००० ते ६००० गिरणी कामगारांना बारा महिन्यांचा पूर्ण पगार अद्याप मिळालेला नाही. तर ३८ महिन्यांचा ५० टक्के पगारही थकीत असून निवृत्ती वेतनही मिळालेले नाही. त्यामुळे गिरणी कामगार आर्थिक अडचणीत असून पगाराची आणि निवृत्ती वेतनाची थकीत रक्कम मिळावी यासाठी गिरणी कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे. चार गिरण्यांच्या प्रवेशद्वारावर ७ सप्टेंबरपासून कामगारांचे बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. येत्या काही दिवसांत पगार आणि निवृत्ती वेतनाचा प्रश्न मार्गी लागला नाही, तर आंदोलन तीव्र करण्याचा, प्रसंगी आत्मदहन करण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.

एनटीसीच्या १५ गिरण्यांपैकी सध्या ४ गिरण्या कार्यान्वित आहेत. तर बंद गिरण्यांमधील कामगारांना १२ महिन्यांचा पगार आणि ३८ महिन्यांचा ५० टक्के पगार मिळालेला नाही. तसेच निवृत्ती वेतनाचाही प्रश्न मार्गी लागलेला नाही. थकीत पगार आणि निवृत्ती वेतन मिळावे यासाठी गिरणी कामगार आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघ सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मात्र तरीही हा प्रश्न मार्गी लागत नसल्याने ७ सप्टेंबरपासून गिरणी कामगारांनी बेमुदत साखळी उपोषण सुरू केल्याची माहिती राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई यांनी दिली. टाटा मिल, इंदू मिल क्रमांक ५, पोदार आणि दिग्विजय या गिरण्यांच्या प्रवेशद्वारावर गिरणी कामगारांचे बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. अद्यापही गिरणी कामगारांच्या थकीत रकमेचा प्रश्न निकाली निघालेला नसल्यामुळे आता गिरणी कामगार आक्रमक झाले आहेत. येत्या काही दिवसांत प्रश्न निकाली लागला नाही, तर आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा दिला आहे.

न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहणार

गिरणी कामगार आर्थिक अडचणीत असून वैफल्यग्रस्त कामगारांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. यासंबंधीचे लेखी निवेदनही राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने भोईवाडा पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे. त्यामुळे यावरून वातावरण तापण्याची शक्यता आहे. दरम्यान, विधान परिषदेचे उपसभापती आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी यासाठी केंद्र सरकारशी चर्चाही केली आहे. मात्र अद्यापही थकीत रक्कम मिळण्याबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे जोपर्यंत पगार आणि निवृत्तीवेतन मिळण्यासंबंधीचा ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत बेमुदत साखळी उपोषण सुरूच राहील, असेही देसाई यांनी सांगितले.