लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : मुंबईत मागील काही दिवसांपासून उकाड्यात वाढ झाली असून कमाल तापमान सरासरीहून अधिक नोंदले जात आहे. ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात उकाड्यात लक्षणीय वाढ झाल्याने मुंबईकरांना घामांच्या धारांचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात मंगळवारी २८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. जे सरासरी किमान तापमानाहून २.७ अशांनी अधिक होते. दशकभराने किमान तापमानात वाढ झाली असून मागील ५७ वर्षांतील हवामान नोंदीनुसार हे सर्वाधिक चौथ्या क्रमांकाचे किमान तापमान आहे.
मुंबईकरांना यंदा तीव्र उन्हाळ्याचा सामाना करावा लागला. मोसमी पाऊस उशिराने दाखल झाल्याने दीर्घ काळ उष्णता कायम होती. मुंबईतून मोसमी पावसाने माघार घेतल्याची घोषणा हवामान विभागाने शनिवारी केली. मात्र, सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासूनच मुंबईतील उकाड्यात वाढ झाली होती. मुंबईच्या हवामान होणाऱ्या बदलांमुळे मागील काही वर्षांतील हवामानाचे विक्रम मोडले जात आहेत. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातही कुलाबा येथे २८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती, जे मागील ५७ वर्षांच्या हवामान नोंदीनुसार सप्टेंबर महिन्यातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक किमान तापमान ठरले. दरम्यान, हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात मंगळवारी २४ अंश सेल्सिअस, तर कुलाबा येथे २८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. यापूर्वी कुलाबा केंद्रात २५ ऑक्टोबर २०१५ रोजी २८.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती.
यंदा हवामानात झालेल्या बदलामुळे मुंबईत दिवसाच्या आणि रात्रीच्या उकाड्यात लक्षणीय वाढ नोंदली जात आहे. उन्हळ्याच्या दिवसातही मुंबईकरांना दीर्घ काळ रात्रीच्या उकाड्याचा सामना करावा लागला. यंदा प्रशांत महासागरात ‘एल निनो’ स्थिती असल्याने, तसेच ऑक्टोबरपासून त्याच्या तीव्रतेत वाढ होण्याची शक्यता असल्याने मुंबईतील यंदाच्या हिवाळ्यात उकाड्याचा सामाना करावा लागू शकतो, अशी शक्यता हवामान अभ्यासक व्यक्त करत आहे.
मागील काही दिवसांच्या तुलनेत सोमवारपासून मुंबईच्या कमाल तापमानात कशीही घट झाली. उकाडा कायम असला तरीही उन्हाची तीव्रता कमी झाल्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात मंगळवारी ३२.३ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३३.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दरम्यान, मुंबई शहर आणि उपनगरात बुधवारी कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअल्स राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात बुधवारी २६.५ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात २६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.
