मुंबई: एकात्मिक तिकिट प्रणालीअंतर्गत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तयार केलेल्या (एमएमआरडीए) मुंबई वन अॅपला प्रवाशांची पसंती मिळत आहे. हे अॅप कार्यान्वित झाल्यापासून आतापर्यंत या अॅपवरुन २७ लाख ८२ हजार तिकिटांची खरेदी करण्यात आली आहे. पाच लाखांहून अधिक प्रवाशांनी नोंदणी केली आहे. अॅप कार्यान्वित झाल्यापासून केवळ साडेतीन महिन्यात २७ लाखांहून अधिक तिकिटांची खरेदी या अॅपवरुन झाली आहे. मुंबईत सध्या कार्यान्वित असलेल्या चारही मेट्रो मार्गिकेवरील प्रवाशांसह उपनगरीय रेल्वे, बेस्ट आणि नवी मुंबई मेट्रो मार्गिकेवरील प्रवाशांकडून या अॅपचा वापर केला जात आहे.
मुंबईत सध्या घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा मेट्रो १, दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ, दहिसर ते गुंदवली मेट्रो ७ आणि आरे ते कफ परेड भुयारी मेट्रो ३ या चार मेट्रो मार्गिका सेवेत आहेत. या मेट्रो मार्गिकांवरुन प्रवास करण्यासाठी मेट्रो प्रवाशांना वेगवेगळे तिकिट खरेदी करावे लागत होते. तर बेस्ट, रेल्वेने प्रवास करतानाही वेगळे तिकिट खरेदी करावे लागत होते. यात प्रवाशांचा वेळ जात होता, रांगेत उभे रहावे लागत होते.
ही बाब लक्षात घेतला राज्य सरकारने एमएमआरडीएला एकात्मिक तिकिट प्रणालीअंतर्गत रेल्वे, बेस्ट, मोनो, मेट्रोसह अन्य वाहतूक व्यवस्थेसाठी एकच स्मार्ट कार्ड आणि अॅप तयार करण्याची जबाबदारी दिली होती. त्यानुसार एमएमआरडीएने मुंबई वन कार्ड आणि मुंबई वन अॅप तयार केले. हे मुंबई वन अॅप आॅक्टोबर २०२५ मध्ये कार्यान्वित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या अॅपचा प्रारंभ करण्यात आला.
त्यानंतर मुंबईतील चार मेट्रो मार्गिकेसह नवी मुंबई मेट्रो मार्गिकेवरील प्रवाशांना, बेस्ट, उपनगरीय रेल्वेसाठी या अॅपचा वापर सुरु झाला. हा अॅप सेवेत दाखल झाल्यापासून अवघ्या साडे तीन महिन्यात अॅपला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली आहे.
मुंबई वन अॅप सेवेत दाखल झाल्यापासून आॅक्टोबर २०२५ ते जानेवारी २०२६ पर्यंत, केवळ साडे तीन महिन्यात या अॅपवरुन २७ लाख ८२ हजार तिकिटांची खरेदी झाली आहे. तर पाच लाख प्रवाशांनी अॅपवर नोंदणी केली आहे. मुंबईतील चार मेट्रो मार्गिकांसह नवी मुंबई मार्गिका, रेल्वे आणि बेस्ट प्रवाशांकडून ही तिकिट खरेदी करण्यात आली आहे. मुंबई मेट्रो २अ आणि ७ मार्गिकेसाठी ७ लाख ६८ हजार २४८ तिकिटांची, मेट्रो ३ मार्गिकेवरुन ७ लाख ३९ हजार ९७७ तिकिटांची, मेट्रो १ मार्गिकेवरुन ७ लाख २६ हजार, ७१४ तिकिटांची, नवी मुंबई मेट्रो मार्गिकेवरुन ८९ हजार ७४५, उपनरीय रेल्वेवरुन ३ लाख ९३ हजार ४६४ तिकिटांती तर बेस्टवरुन प्रवास करणार्यांनी ४८ हजार ३८७ तिकिटांची खरेदी झाल्याची माहिती एमएमआरडीएला दिली आहे.
