मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) एकात्मिक तिकीट प्रणालीअंतर्गत तयार केलेल्या ‘मुंबई वन’ ॲपला प्रवाशांची पसंती मिळत आहे. हे ॲप कार्यान्वित झाल्यापासून आतापर्यंत १० महिन्यांत यावरून १ कोटी ४ लाख ११ हजार ८२४ तिकिटांची खरेदी करण्यात आली.
मुंबईत सध्या कार्यान्वित असलेल्या सहा मेट्रो मार्गिकांवरील प्रवाशांसह उपनगरीय रेल्वे, बेस्ट आणि नवी मुंबई मेट्रो मार्गिकेवरील प्रवाशांकडून या ॲपचा वापर केला जात आहे. मुंबईत सध्या ‘घाटकोपर – अंधेरी – वर्सोवा मेट्रो १’, ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’, ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ आणि ‘आरे – कफ परेड भुयारी मेट्रो ३’ या चार मेट्रो मार्गिका सेवेत आहेत. काही महिन्यांपूर्वी ‘अंधेरी पश्चिम – मंडाले मेट्रो २ ब’ मार्गिकेवरील मंडाले – डायमंड गार्डन असा पहिला टप्पा आणि ‘दहिसर – मिरा-भाईंदर मेट्रो ९’ मार्गिकेतील दहिसर – काशीगाव टप्पा सेवेत दाखल झाला आहे.
या मेट्रो मार्गिकांवरून प्रवास करण्यासाठी मेट्रो प्रवाशांना वेगवेगळी तिकिटे खरेदी करावी लागत होती. तसेच बेस्ट, रेल्वेने प्रवास करतानाही वेगळी तिकिटे खरेदी करावी लागत होती. यात प्रवाशांचा वेळ जात होता, तसेच रांगेत उभे राहावे लागत होते. ही बाब लक्षात घेता राज्य सरकारने एमएमआरडीएला एकात्मिक तिकीट प्रणालीअंतर्गत रेल्वे, बेस्ट, मोनो, मेट्रोसह अन्य वाहतूक व्यवस्थेसाठी एकच स्मार्ट कार्ड आणि ॲप तयार करण्याची जबाबदारी दिली होती. त्यानुसार एमएमआरडीएने ‘मुंबई वन’ कार्ड आणि ‘मुंबई वन’ ॲप तयार केले.
‘मुंबई वन’ ॲप ऑक्टोबर २०२५ मध्ये कार्यान्वित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ॲपचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर मुंबईतील मेट्रो मार्गिकांसह नवी मुंबई मेट्रो मार्गिकेवरील प्रवाशांना, बेस्ट व उपनगरीय रेल्वेसाठी या ॲपचा वापर सुरू झाला. हे ॲप सेवेत दाखल झाल्यापासून अवघ्या काही महिन्यांतच त्याला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत गेला. आता या ॲपवरून एकूण १ कोटी ४ लाख ११ हजार ८२४ तिकिटांची खरेदी झाली आहे.
‘मुंबई वन’वरील तिकीट व्यवहारांमध्ये मेट्रो सेवेचा सर्वाधिक वाटा आहे. ‘मेट्रो २ अ’, ‘मेट्रो ७’, ‘मेट्रो २ ब’ आणि ‘मेट्रो ९’साठी ३० लाख १० हजार ५५४, ‘मेट्रो १’साठी २८ लाख ४७ हजार ६८२ आणि ‘मेट्रो ३’साठी २४ लाख ३० हजार ३७० तिकिटे खरेदी करण्यात आली आहेत. विविध मेट्रो सेवांसाठी एकूण ८२ लाख ८८ हजार ६०६ तिकिटे खरेदी झाली आहेत. एकूण तिकीट व्यवहारांपैकी जवळपास ८० टक्के व्यवहार मेट्रोचे आहेत. याशिवाय उपनगरीय रेल्वेसाठी १५ लाख ७० हजार ९०६ तिकिटे खरेदी करण्यात आली. ‘नवी मुंबई मेट्रो मार्गिका १’साठी ३ लाख ३८ हजार ७१८, ‘बेस्ट’साठी १ लाख ५३ हजार ३२३, ‘टीएमटी’साठी ३३ हजार ७०६, ‘एनएमएमटी’साठी १६ हजार ६९८, ‘एमबीएमटी’साठी ७ हजार ५५३ आणि ‘केडीएमटी’साठी २ हजार ३१४ तिकिटे ॲपद्वारे खरेदी करण्यात आली.
‘मुंबई वन’ला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ‘वन एमएमआर’च्या संकल्पनेच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. विविध वाहतूक सेवा एका सामायिक तिकीट प्रणालीवर आणणे ही महत्त्वपूर्ण कामगिरी असल्याचे उपमुख्यमंत्री तथा ‘एमएमआरडीए’चे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी सांगितले. एकात्मिक व डिजिटल मोबिलिटीचा प्रवाशांनी स्वीकार केल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत असल्याचे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले.
