मुंबई : साकीनाका येथे गुरुवारी उघड्या मनुष्य प्रवेशिकेत (मॅनहोल) पडून ५५ वर्षीय अस्लम शेख यांचा मृत्यू झाल्यानंतर शहरातील असुरक्षित मनुष्य प्रवेशिकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आतापर्यंत मुंबईत अनेक वेळा अशा दुर्घटना घडल्या असून अनेकांना त्यात जीव गमवावा लागला आहे. मात्र, या दुर्घटनांमधून अद्यापही महानगरपालिका प्रशासनाने पुरेसा बोध घेतलेला नाही. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे उघड्या मनुष्य प्रवेशिका मुंबईकरांसाठी ‘मृत्यूचे सापळे’ बनत आहेत. दरम्यान, आतापर्यंत मुंबईत सुमारे चार हजार मनुष्य प्रवेशिकांवर संरक्षण जाळ्या बसविलेल्या नाहीत. त्यामुळे मुंबईकरांना जीव मुठीत घेऊनच रस्त्यावरून प्रवास करावा लागणार आहे.
महानगरपालिका प्रशासनाने उघड्या मनुष्य प्रवेशिकांमुळे होणाऱ्या दुर्घटना रोखण्यासाठी काही वर्षांपूर्वी पर्जन्य जलवाहिन्या, सांडपाणी वाहिन्या तसेच नाल्यांवरील मनुष्य प्रवेशिकांवर संरक्षक जाळ्या बसविण्याचा निर्णय होता. मुंबईत १ लाख ३ हजार ९२६ मनुष्य प्रवेशिका आहेत. त्यापैकी ९६ हजार ३८३ मनुष्य प्रवेशिकांवर जाळ्या बसविल्याचा दावा पालिकेने केला आहे. रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामासाठी ४ हजार ४४६ मनुष्य प्रवेशिका उघडण्यात आल्या होत्या. त्यावर संरक्षक जाळ्या बसविण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे भविष्यात पुन्हा अशा दुर्घटना घडू नयेत, यासाठी महानगरपालिकेने युद्धपातळीवर संरक्षक जाळ्या बसविण्याचे काम हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
यापूर्वी ऑगस्ट २०१७ मध्ये प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. दीपक अमरापूरकर यांचा वरळीतील उघड्या मनुष्य प्रवेशिकामध्ये पडून मृत्यू झाला होता. मलनिःसारण वहिनीच्या स्वच्छता कामादरम्यान मार्च २०२४ मध्ये सुरज केवट, बिलास केवट, रामलगन केवट या तीन कामगारांचा मृत्यू झाला. दरम्यान, ऑगस्ट २०२४ मध्ये स्वच्छता कामासाठीच आत गेलेल्या सुनील वाकोडे या कामगारालाही जीव गमवावा लागला. त्यापूर्वीही अशाच आणखी काही घटना घडल्या. २०२६ उजाडले तरीही अशा घटना रोखण्यात महापालिकेला यश आलेले नाही. त्यामुळे मुंबईकर आणि विरोधकांकडून महापालिका प्रशासनाविरोधात टीकेची झोड उठत आहे.
मुसळधार पावसात अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली जातात. रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे मनुष्य प्रवेशिकांचे झाकण उघडे आहे की बंद, हे नागरिकांना ओळखणे कठीण जाते. अशा परिस्थितीत उघडी किंवा संरक्षण जाळी नसलेली मनुष्य प्रवेशिका मृत्यूचे सापळे बनण्याची दाट शक्यता असल्याने महापालिकेने सर्व मनुष्य प्रवेशिकांची पडताळणी करण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. वारंवार घडणाऱ्या दुर्घटनांमधून पालिकेने पुरेसा बोध घेतलेला दिसत नसल्याची टीकाही नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान, उर्वरित सर्व नमुष्य प्रवेशिकांवर तातडीने संरक्षण जाळ्या बसविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
आतापर्यंतच्या घटना
मृतांची नावे – ठिकाण – वर्ष
डॉ. दीपक अमरापूरकर – वरळी – ऑगस्ट २०२६
दिनेश जाठोलिया – कुर्ला – जून २०१८
अर्जुन – मालाड – २०१८
शीतल भानुशाली – घाटकोपर – ऑक्टोबर २०२०
सुरज, बिलास, रामलगन केवट – मालाड – मार्च २०२४
सुनील वाकोडे – बोरिवली – ऑगस्ट २०२४
रघू सोलंकी, जावेद शेख – मालाड – एप्रिल २०२४
विमल गायकवाड – चेंबूर – सप्टेंबर २०२४
