मुंबई : वसईहून जोगेश्वरीला नातेवाईकाकडे येताना खासगी टॅक्सीमध्ये विसरलेले सोन्याच्या दागिन्यांची बॅग ओशिवरा पोलिसांनी तक्रारदाराला परत मिळवून दिली. त्यात सुमारे ३५ तोळे सोन्याचे दागिने होते. त्याची किंमत २५ लाख रुपये आहे. दागिने परत मिळाल्यामुळे तक्रारदारासह त्यांच्या कुटुंबियांनी ओशिवरा पोलिसांचे आभार मानले. व्यवसायाने व्यापारी असलेले नजीरूल याकूब हसन वसईतील रश्मी कॉम्प्लेक्स, बंगला क्रमांक ४५ येथे राहतात. त्यांचे नातेवाईक सय्यद हातीब जोगेश्वरीतील आदर्शनगर परिसरात राहतात. शुक्रवारी ९ ऑगस्टला ते वसई येथून त्यांच्या कुटुंबियांसोबत जोगेश्वरीतील नातेवाईकाकडे जाण्यासाठी निघाले होते. यावेळी त्यांनी खासगी टॅक्सी केली. त्यांनी २५ लाखांचे ३५ तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅगही सोबत घेतली होती. जुबेर वाईन शॉपजवळ मोटरगाडीमधून उतरल्यानंतर ते नातेवाईकाकडे घरी गेले. दुसर्या दिवशी म्हणजे १० ऑगस्ट रोजी त्यांना त्यांची सोन्याची दागिने असलेली बॅग दिसली नाही. त्यांनी बॅग शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना बॅग कुठेच सापडली नाही. यावेळी त्यांना बॅग टॅक्सीमध्ये विसरल्याचे लक्षात आले. या घटनेनंतर त्यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन पाटील यांची भेट घेऊन त्यांना घडलेला प्रकार सांगितला. या घटनेनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांच्या पथकाने टॅक्सीचालकाचा शोध सुरू केला. हेही वाचा.महाराष्ट्रालाही न्याय मिळावा; सुप्रिया सुळे यांची अपेक्षा परिसरातील सीसी टीव्ही चित्रण पाहिल्यानंतर तक्रारदारांनी सोन्याच्या दागिन्यांची बॅक खासगी टॅक्सीत विसरल्याचे उघडकीस आले. टॅक्सीचा क्रमांक मिळाल्यानंतर पोलिसांनी उल्हासनगरला राहणारा चालक शंकर बन्सी शिंदे याच्याशी संपर्क साधला. यावेळी त्याने उडवाडवीचे उत्तरे देऊन बॅग त्याच्या टॅक्सीत राहिली नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने पोलिसांचे दूरध्वनी घेतले नाहीत. सोमवारी १२ ऑगस्ट रोजी पोलिसांनी त्याच्या पत्नीशी संपर्क साधला असता तिने ती बॅग तिच्याकडे असल्याचे सांगितले. त्यांनतर पोलीस पथक उल्हासनगरला गेले आणि त्यांनी शंकर शिंदे याच्या घरातून ही बॅग ताब्यात घेतली. दागिने असलेली बॅग नंतर तक्रारदारांच्या स्वाधीन करण्यात आली. १० ऑगस्ट रोजी तक्रार केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत ओशिवरा पोलिसांनी टॅक्सीचालकाचा शोध घेऊन सुमारे २५ लाख रुपये किंमतीचे ३५ तोळे सोन्याचे दागिने तक्रारदारांना परत मिळवून दिले, त्यामुळे हसन कुटुंबियांनी ओशिवरा पोलिसांचे आभार मानले.