Premium

मुंबई पारबंदर प्रकल्प : सागरी सेतूचे संचालन; देखभालीसाठी लवकरच आंतरराष्ट्रीय कंत्राटदाराची नियुक्ती

मुंबईतील शिवडी – नवी मुंबई दरम्यानचा प्रवास २० ते २२ मिनिटांत पार करता यावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मुंबई पारबंदर प्रकल्प (अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू) उभारत आहे.

Mumbai Parbandar Project
मुंबई पारबंदर प्रकल्प

मुंबई : मुंबईतील शिवडी – नवी मुंबई दरम्यानचा प्रवास २० ते २२ मिनिटांत पार करता यावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मुंबई पारबंदर प्रकल्प (अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू) उभारत आहे. या प्रकल्पाचे आतापर्यंत ९६.६० टक्के काम पूर्ण झाले आहे. तर उर्वरित काम डिसेंबरअखेरीस पूर्ण करून नव्या वर्षाच्या सुरुवातीला सागरी सेतू वाहतूक सेवेत दाखल करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे. त्यानुसार सागरी सेतू सुरू करण्याच्यादृष्टीने आता एमएमआरडीएने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या प्रकल्पाच्या संचालन आणि देखभालीसाठी एमएमआरडीएने गुरुवारी निविदा जारी केली. या निविदेनुसार प्रकल्पाच्या संचालन आणि देखभालीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपनीची नियुक्ती करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई – नवी मुंबई प्रवास सुकर आणि वेगवान करण्यासाठी एमएमआरडीएकडून २१.८० किमी लांबीच्या शिवडी – न्हावाशेवा सागरी सेतूची उभारणी करण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या कामाला २०१८ मध्ये सुरुवात करण्यात आली होती. हे काम सप्टेंबर २०२२ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र करोना आणि इतर अडचणींमुळे या कालावधीत प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. पण आता मात्र डिसेंबर २०२३ पर्यंत हा सागरी सेतू वाहतुकीसाठी सुरू करण्याच्या दृष्टीने कामाला वेग देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी या प्रकल्पाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला होता. आता या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आतापर्यंत प्रकल्पाचे ९६.६० टक्के काम पूर्ण झाले आहे. तसेच तांत्रिक कामांनाही सुरुवात करण्यात आली असून या कामांनाही वेग देण्यात आला आहे.

हेही वाचा >>> फुलांचा कचरा रस्त्यावर टाकणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा

कोणत्याही परिस्थितीत डिसेंबरअखेर हा प्रकल्प पूर्ण करून वर्षअखेरीस किंवा नव्या वर्षाच्या सुरुवातीला सागरी सेतू वाहतूक सेवेत दाखल करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती एमएमआरडीएतील सूत्रांनी दिली. हा प्रकल्प वाहतूक सेवेत दाखल करण्याच्यादृष्टीने एमएमआरडीएने आणखी एक महत्त्वाचे पाऊल पुढे टाकले आहे. शिवडी – न्हावाशेवा सागरी सेतूचे संचालन आणि देखभालीसाठी एमएमआरडीएने गुरूवारी निविदा मागविल्या आहेत. सागरी सेतूचे संचालन, देखभालीचा अनुभव असलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत.

टोल किती असणार?

सागरी सेतूवरून मुंबई – नवी मुंबई अंतर २० ते २२ मिनिटांत पार करण्यासाठी नागरिकांना पैसे मोजावे लागणार आहेत. या सागरी सेतूवरून जाण्यासाठी पथकर (टोल) आकारण्यात येणार आहे. या मार्गावर आठ ठिकाणी पथकर नाके उभारण्यात येणार असून हे पथकर नाके स्वयंचलित असणार आहेत. ओपन रोड टोलिंग पद्धतीने पथकर वसूल करण्यात येणार आहे. या मार्गावरून जाण्यासाठी नेमका किती पथकर आकारायचा हे अद्याप निश्चित झालेले नाही. पथकर किती असावा याची शिफारस करण्यासाठी राज्य सरकारने एक समिती स्थापन केली आहे. ही समिती लवकरच शिफारस अहवाल सादर करण्याची शक्यता आहे. असे असले तरी २४० रुपये ते ७५० रुपयांदरम्यान पथकर असण्याची शक्यता आहे. मात्र ही केवळ शक्यता असून नेमका पथकर किती असेल हे नोव्हेंबरअखेरपर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mumbai parbandar project operation of sea bridge tenders invited by mmrda mumbai print news ysh

First published on: 05-10-2023 at 13:32 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा