मुंबई : ईदनिमित्त निघालेल्या मिरवणुकीदरम्यान दोन गटांत वाद आणि दगडफेक झाल्याची घटना परळ चिंचपोकळी भागातील लक्ष्मी कॉटेज या इमारतीजवळ बुधवारी रात्री घडली. मात्र पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

ईदच्या मिरवणुकीदरम्यान दोन गटांत धक्काबुक्की आणि शाब्दिक चकमक उडाल्यानंतर लक्ष्मी कॉटेज इमारतीजवळ तणाव निर्माण झाला होता.

‘अफवांवर विश्वास ठेवू नका’ – पोलीस

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. सह पोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) डॉ. मनोज शर्मा यांनी एएनआयला सांगितले, “आता या परिसरात कोणताही तणाव नाही. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून परिसरात शांतता आहे. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका.”

आयएएनएसशी बोलताना, स्थानिक रहिवाशानेही मध्यरात्रीच परिस्थिती नियंत्रणात आल्याचे सांगितले. याचे पूर्ण श्रेय पोलिसांना जात असल्याचे ते म्हणाले.

एएनआयने परळ-चिंचपोकळी परिसरातील सकाळचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात परिस्थिती सामान्य दिसत आहे. पोलिसांचा बंदोबस्त अद्यापही परिसरात आहे.