मुंबई : वाढदिवस, लग्नसमारंभ आणि मिरवणूका अशा विविध सार्वजनिक उत्सवांमध्ये फोडल्या जाणाऱ्या पार्टी पॉपरमधील प्लास्टिक कन्फेटीच्या विक्री आणि वापरावर बंदी घालण्याची मागणी मुंबई महापालिकेच्या एका नगरसेविकेने केली आहे. या पार्टी पॉपरमधील प्लास्टिक कन्फेटी अर्थात प्लास्टिकच्या बारीक तुकड्यांमुळे पर्यावरणाला नुकसान होत असल्याने ही मागणी केली आहे.

आनंद किंवा उत्सव साजरा करताना अनेकदा हे पार्टी पॉपर म्हणजेच पुठ्ठ्याचे नळकांडे फोडले जातात. त्यातून मोठा आवाज होतो आणि त्याबरोबर प्लास्टिकचे किंवा कागदाचे बारिकबारिक तुकडे वातावरणात पसरतात. गेल्या काही वर्षात या पार्टी पॉपरचा वापर वाढला आहे. मात्र हे पार्टी पॉपर आणि त्यातील प्लास्टिकचे तुकडे पर्यावरणासाठी धोकादायक असल्यामुळे त्यावर बंदी आणावी अशी मागणी नगरसेविका अश्विनी मते यांनी केली आहे.

प्लास्टिक कन्फेटीच्या (प्लास्टिकचे छोटे चमकदार तुकडे) विक्री आणि वापरावर मुंबई महानगरपालिका क्षेत्रात बंदी घालावी, अशी सूचना मते यांनी केली. त्यांची ही ठरावाची सूचना पालिकेच्या सभागृहातील कामकाजात मंजूरीसाठी येणार आहे.

अविघटनशील घटक असल्याने पाणी निचऱ्यात अडथळा – प्लास्टिक कन्फेटीचे तुकडे अत्यंत सूक्ष्म आकाराचे असल्यामुळे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना ते पूर्णपणे झाडून गोळा करणे शक्य होत नाही. हे तुकडे अविघटनशील (नॉन-बायोडिग्रेडेबल) असल्याने पावसाळ्यात किंवा वाऱ्यामुळे नाल्यांमध्ये आणि गटारांमध्ये वाहून जातात. त्यामुळे गटारे तुंबणे, सांडपाण्याचा निचरा बाधित होणे आणि जलप्रदूषण वाढणे अशा समस्या निर्माण होत असल्याचे मते यांनी आपल्या ठरावात म्हटले आहे.

मुंबईला प्लास्टिकमुक्तीसाठी महापालिकेने उपाययोजना राबवल्या असल्या तरी प्लास्टिक कन्फेटीच्या वापराकडे दुर्लक्ष होत आहे, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि नाल्यांमधील अडथळे कमी करण्याच्या उद्देशाने महापालिका क्षेत्रात प्लास्टिक कन्फेटीच्या विक्री आणि वापरावर बंदी लागू करावी, अशी मागणी आहे.

पार्टी पॉपर आणि प्लास्टिक कन्फेटी म्हणजे काय?

उत्सवात किंवा पार्टीत एक पुठ्ठ्यापासून बनवलेले नळकांडे फोडले जाते. या नळकांड्याला खाली दोरी असते ती ओढल्यावर त्यातून मोठा आवाज होतो आणि रंगीबेरंगी कागदाच्या चकत्या उडतात.