मुंबईः छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमातळावरील अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे बनावट व्हिसाद्वारे हंगेरी येथे जाण्याची योजना आखत असलेल्या नेपाळी वंशाच्या व्यक्तीला पकडण्यात आले. गंभीर बाब म्हणजे दलालाने त्याला सहा लाख रुपयांमध्ये भारतीय पारपत्र व बनावट व्हिसा बनवून दिला होता. आरोपी प्रवाशाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून संशयीत दलालाची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

सहाय्यक इमिग्रेशन अधिकारी सुशांत रजक (२८) १० जून रोजी मुंबई विमानतळावर कार्यरत होते. त्यावेळी त्यांच्या काऊंटरवर एक प्रवासी आला. त्याच्याकडे भारतीय पारपत्र, तुर्कस्तानचा व्हिसा, बोर्डींग पास व विमानाचे तिकीट सापडले. तो तुर्कस्तानवरून दुसऱ्या विमानाने हंगेरीला जाणार होता. हंगेरीला नेमक्या कोणत्या कामासाठी जात आहे, अशी विचारणा रजक यांनी केली असता त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यावेळी तपासणी केली असता त्याच्याकडे हंगेरीचे अधिकृत पारपत्र सापडले नाही. तसेच त्याच्याकडील कागदपत्रे तपासली असता तो नेपाळी नागरिक असल्याचे निष्पन्न झाले. त्याचा मोबाइल तपासला असता त्यात नेपाळी पारपत्र, चालक परवाना, नेपाळचा नागरिक असल्याचे ओळखपत्र सापडले. त्याची चौकशी केली असता त्याने आपण नेपाळचा नागरिक असल्याचे मान्य केले.

हेही वाचा – मुंबई : बँकेच्या व्यवस्थापकाची फसवणूक

आरोपी प्रवासी सुमनसुख बहादूर तमंग एक वर्षांपूर्वी पश्चिम बंगालमधील एका दलालाच्या संपर्कात आला होता. त्याने हंगेरीतील गोदामांमध्ये पॅकिंगचे काम मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी त्याने पैशांची मागणी केली. सुरुवातील आरोपीन १० लाख रुपयांची मागणी केली. पण तेवढी रक्कम नसल्याने आरोपीने त्याच्याकडून तीन लाख रुपये आगाऊ घेतले. त्याआधारे त्याने आरोपीला भारतीय पारपत्र मिळवून दिले. तसेच त्यानंतर हंगेरीत नोकरीचेही काम झाल्याचे सांगितले. त्या आशेवर त्याने दलालाला आणखी तीन लाख रुपये दिले. त्यानंतर दलालाने त्याला विविध कागदत्रे दिली. त्यात हंगेरीचा बनावट व्हिसाही समावेश होता. पण हंगेरीला जाण्यापूर्वीच त्याला मुंबई विमातळावर पकडण्यात आले.

हेही वाचा – मुंबई : ‘एमएमआरडीए’ची वसुलीवर भिस्त; पालिकेकडे चार हजार, तर सरकारकडे साडेतीन हजार कोटींची थकबाकी

आरोपी सुमनसुख बहादुर तमंग हा एका मित्रामार्फत आरोपी दलालाच्या संपर्कात आला होता. त्याने यापूर्वीही अनेकांना परदेशात नोकरीसाठी पाठवल्याचे मित्राने सांगितले होते. त्यामुळे तमंगने या दलालाशी संपर्क साधला. त्याचीही आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे नोकरीसाठी त्याने दलालाला रक्कम देऊन परदेशात जाण्याचा निर्णय घेतला. याप्रकरणी सहार पोलिसांनी आरोपी प्रवाशाला ताब्यात घेतले असून दलालाचा शोध सुरू आहे.