मुंबई : मुंबईत शुक्रवारी ६७९ नवीन रुग्णांची नोंद झाली. उपचाराधीन रुग्णांची संख्याही वाढली असून ती ५ हजार ३९२ झाली आहे. शुक्रवारी आढळलेल्या नव्या रुग्णांपैकी ९० टक्के जणांना लक्षणे नाहीत. तर, ६५ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. १८ रुग्णांना प्राणवायू द्यावा लागला. सध्या एकूण ४८१ रुग्ण रुग्णालयात दाखल असून प्राणवायू खाटांवर २५ रुग्ण आहेत. दिवसभरात १०९९ रुग्ण करोनामुक्त झाले.

 आतापर्यंत बाधितांची संख्या ११ लाख ४१ हजारांवर गेली आहे. तर, रुग्णवाढीचा दर वाढत असून ०.०७ टक्के झाला. रुग्णदुपटीचा कालावधी कमी होऊन ९२९ दिवस झाला. शुक्रवारी दोन रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात एक ८० वर्षीय पुरुष होता. त्याला रक्तदाब आणि मधुमेह असे आजार होते. मृत्यू झालेली दुसरी ४९ वर्षीय महिला रुग्ण असून ती कर्करोगानेही आजारी होती.

ठाणे जिल्ह्यात ३५५ नवे करोना रुग्ण

ठाणे : ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी ३५५ नवे करोना रुग्ण आढळले. या रुग्णांपैकी ठाणे १४३, नवी मुंबई १३२, कल्याण डोंबिवली ३४, उल्हासनगर १५, मीरा भाईंदर १४, ठाणे ग्रामीण १०, भिवंडी पाच आणि बदलापूर पालिका क्षेत्रात दोन रुग्ण आढळले. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील करोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या २ हजार ३६२ आहे.