मुंबई : मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानुसार ‘पादचारी प्रथम’ उपक्रमाअंतर्गत पादचाऱ्यांसाठी ठिकठिकाणच्या पदपथांवरील अडथळे दूर करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सी विभाग कार्यालयाने मरिन ड्राईव्ह परिसरातील ई मार्ग आणि एच मार्ग येथील प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपुलाखालील परिसराचे सुशोभीकरण करून पदपथ पादचारीस्नेही बनविण्यात आला आहे. या सुशोभित परिसराचे लोकार्पण महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या परिसरात यापूर्वी ई मार्ग व एच मार्गावर पादचाऱ्यांसाठी पदपथ उपलब्ध नव्हता. तसेच एच मार्गाची रुंदी अवघी ४ मीटर असल्याने उड्डाणपुलाखालील सार्वजनिक शौचालय, महानगरपालिका बँक व घनकचरा व्यवस्थापन चौकी यासारख्या संरचनांमुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागत होते. परिणामी, वाहतूक कोंडी, तसेच अपघातांचा धोका निर्माण होत होता. एकूणच येथील रचना लक्षात घेऊन महानगरपालिकेने उड्डाणपुलाखालील अडथळा ठरणाऱ्या संरचनांचे पर्यायी ठिकाणी स्थलांतर केले.
हा परिसरा मोकळा झाल्यानंतर सुरक्षित पादचारी मार्ग, उद्यान विकास व आकर्षक सुशोभीकरणाची कामे करण्यात आली. या प्रकल्पामुळे पूर्वी वाहतुकीस अडथळा ठरणारा व दुर्लक्षित असलेला उड्डाणपुलाखालील परिसर आता सुरक्षित, आकर्षक, हरित आणि पादचारीस्नेही सार्वजनिक जागेत रूपांतरित झाला आहे. या लोकार्पण सोहळ्यास स्थानिक नगरसेविका रीटा मकवाना, उप आयुक्त (परिमंडळ-१) चंदा जाधव तसेच सहाय्यक आयुक्त, सी विभाग सुनील विश्वासराव माने आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रकल्पांतर्गत करण्यात आलेली प्रमुख कामे :
– ई मार्गावर सुमारे १५० मीटर लांबीचा नवीन पदपथाचे बांधकाम
– एच मार्गावर सुमारे १०० मीटर लांबीचा वळणदार पादचारी मार्ग विकसित करण्यात आला.
– ई मार्गालगतच्या भिंतीवर सुमारे ४०० चौ.मी. क्षेत्रफळामध्ये आकर्षक थ्रीडी वॉल पेंटिंग साकारण्यात आले.
– उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत आकर्षक उद्यान विकास, वृक्षारोपण व लँडस्केपिंग करण्यात आले. कमी सूर्यप्रकाशातही चांगल्या प्रकारे वाढणाऱ्या वनस्पतींची लागवड करण्यात आली.
– संपूर्ण २५० मीटर लांबीच्या परिसरात आकर्षक सजावटीचे विद्युत खांब बसविण्यात आले.
– सुमारे ४५ चौ.मी. क्षेत्रफळाची बहुउद्देशीय संरचना उभारण्यात आली असून, तिचा उपयोग केअरटेकर कक्ष, साठवणूक कक्ष व सुरक्षा चौकी म्हणून करण्यात येणार आहे.
– उद्यानातील हरित क्षेत्रात स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणाली बसविण्यात आली.
