मुंबई : स्थानिक गुंडगिरीविरोधात मुंबई पोलिसांनी जोरदार मोहीम उघडली असून पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी ‘शून्य सहनशीलता’ (झिरो टोलरन्स) धोरण अंगीकारले आहे. याच पार्श्वभूमीवर पूर्व उपनगरातील सुमारे ५० गुंडांना गेल्या आठवड्यात तडीपार करण्यात आले. इतक्या मोठ्या प्रमाणात पोलिसांकडून पहिल्यांदाच अशी कारवाई करण्यात आली आहे. गुंडगिरी करणाऱ्यांबाबत स्थानिक पोलीस ठाण्यास माहिती देण्याचे आवाहनही पोलीस आयुक्तांनी केले आहे. स्थानिक पोलिसांनी कारवाई न केल्यास थेट आपल्याकडे तक्रार करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

तडीपारी हे पोलिसांचे जुने हत्यार आहे. त्यानुसार पूर्व उपनगरातील पोलीस ठाण्यांनी त्यांच्या हद्दीतील गुंडांची यादी तयार केली. या गुंडांना तडीपार करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये घाटकोपर (१०), पंतनगर (८), विक्रोळी (४), पार्कसाईट (२), भांडुप (८), कांजूरमार्ग (३), मुलुंड (९) आणि नवघर (६) या पोलीस ठाण्यातील ५० गुंडांचा समावेश आहे.

खून, दरोडे वा अन्य गंभीर गुन्ह्यातील आरोपी वा हिंसक कृत्ये करणारे तसेच महिलांविषयक गुन्ह्यात सहभागी असणारे आणि वारंवार गुन्हे करणाऱ्या गुंडांचा या यादीत प्रामुख्याने समावेश आहे. या गुंडांचा पुर्वेइतिहास तपासून सध्या सक्रिय असणाऱ्या गुंडांविरुद्ध तडीपारीची कारवाई करण्यात आल्याचे पूर्व प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. महेश पाटील यांनी सांगितले. तडीपार केलेल्या गुंडांची छायाचित्रे पोलीस ठाण्यात प्रदर्शित करण्यात आली आहेत. हद्दपार केलेले गुंड परिसरात पुन्हा दिसल्यास तात्काळ पोलीस ठाणे वा उपायुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

तडीपारी म्हणजे काय?

एखाद्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला विशिष्ट कालावधीसाठी विशिष्ट भागातून, शहरातून किंवा जिल्ह्यातून हद्दपार करणे आणि पुन्हा त्या हद्दीत येण्यास मनाई करणे याला तडीपारी म्हटली जाते. एखाद्या परिसरात सतत होणारी गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडून ही प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते. मुंबई पोलीस कायदा (आता महाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१) कलम ५५, ५६ आणि ५७ नुसार कारवाई केली जाते. खून, दरोडा, खंडणी आदीबाबत गंभीर गुन्हे दाखल असलेल्या वा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर ही कारवाई केली जाते. शहरात पोलीस उपायुक्त तर जिल्ह्यात दंडाधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी यांना कारवाईचे अधिकार असतात. या कारवाईचा कालावधी किमान सहा महिने ते दोन वर्षे इतका असतो. तडीपार केलेली व्यक्ती ठराविक काळात सदर परिसरता दिसल्यास, त्याला पुन्हा विनावॉरंट अटक करता येते.