मुंबई : आश्रमशाळेतील सुविधा वाढवण्यात याव्यात या मागणीसाठी आझाद मैदानावर आंदोलन करण्यावर आदिवासी विद्यार्थी ठाम राहिल्याने परळ येथील काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात पोलीस आणि आदिवासी विद्यार्थी यांच्यात मंगळवारी जोरदार धुमश्चक्री उडाली. या अनपेक्षित कारवाईमुळे प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या टिळक भवनला चक्क आखाड्याचे स्वरूप प्राप्त झाले. काँग्रेसच्या कार्यालयात आसरा घेतलेल्या आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थ्यांना चार-चार पोलिसांनी फरफटत नेत बसमध्ये टाकले आणि नाशिकला घेऊन गेले.

आदिवासी विभागाच्या आश्रमशाळा आणि वसतिगृहांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे नाशिकमध्ये ५१ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून हे विद्यार्थी २८ सप्टेंबर रोजी नाशिकहून पायी उलगुलान लाँगमार्च करत मुंबईत सोमवारी आले होते. पोलिसांनी या विद्यार्थ्यांना आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी नाकारली. आज या विद्यार्थ्यांनी टिळक भवनमधून आझाद मैदानाकडे जाण्यासाठी बाहेर पडण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी टिळक भवनकडे जाणारे रस्ते अडवले होते.

टिळक भवनमध्ये घुसून पोलिसांनी या विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यास दुपारी सुरुवात केली. विद्यार्थ्यांनी पोलिसांना जोरदार प्रतिकार केला. त्यामुळे टिळक भवनच्या प्रांगणाला चक्क आखाड्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. एकएका विद्यार्थ्याला चार-चार पोलीस उचलून फरफटत बस मध्ये टाकत होते. त्यात अनेक विद्यार्थ्यांचे कपडे फाटले, मोबाईल व चपला गहाळ झाल्या. अनेकांच्या बॅगा व कपडे टिळक भवन मध्ये राहिल्या. ४०० विद्यार्थी-विद्यार्थ्यांना मुंबई पोलिसांच्या या अमानुष कारवाईचा फटका बसला.

यावेळी विद्यार्थ्यांनी या कारवाई विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदिवासी मंत्री अशोक ऊईके आणि मुंबई पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी केली. मंगळवारी दुपारी हा गोंधळ तासभर चालू होता. मात्र काँग्रेस नेत्यांनी या कारवाईकडे पाठ फिरवली, त्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रतिकार टिकला नाही. विद्यार्थींनींना पुरुष पोलिसांनी बखोटीला पकडून बस मध्ये टाकले. टिळक भवन परिसरातील हा अभूतपूर्व गोंधळ पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती.

काय आहे विद्यार्थ्यांची मागणी?

दूरवर असणाऱ्या मध्यवर्ती स्वयंपाकघरातून आश्रमशाळांना अन्न पुरवण्यात येते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना विषबाधा होते; ही पद्धत बंद करावी, अशी या आदिवासी विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे. मात्र ठेकेदारांच्या लाभासाठी राज्य सरकारला सेंट्रल किचनच्या पद्धतीमध्ये बदल नको आहे. विद्यार्थ्यांचे हे आंदोलन सकल आदिवासी विद्यार्थी कृती समितीच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. मात्र या आंदोलनात काँग्रेसच्या एनएसयूआयचे पदाधिकारी असल्यामुळे सरकार कठोरपणे आंदोलन मोडून काढत आहे.

आझाद मैदान कुलपात :

आझाद मैदानात रोजच आंदोलने असतात. मात्र आदिवासी विद्यार्थी मैदानात येऊ नयेत, यासाठी आज मैदानावर मुंबई पोलिसांनी मोठा फौजफाटा ठेवला होता. मैदानात आंदोलनास परवानगी दिलेल्या संघटनांची यादी प्रवेशद्वारावर पोलीस घेऊन बसले होते. आंदोलकांना आत सोडताना तो कोणत्या संघटनेशी संबंधित आहे, याची खातरजमा केल्याशिवाय सोडले जात नव्हते.