महाराष्ट्र पोलिसांनी सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात आता त्याच्या वडिलांवर गंभीर आरोप केला आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या वडिलांनी जवळच्या नातेवाईकांना प्रतिक्रिया देण्यास सांगितलं. त्यावेळी कोणीही आत्महत्येबाबत संशय व्यक्त केला नाही. तसंच दुसऱ्या कोणा व्यक्तीकडे बोटही दाखवलं नाही. आता मात्र ठरवून पोलिसांवर आरोप केले जात आहेत. या प्रकरणात सुप्रीम कोर्टात ११ ऑगस्ट रोजी सुनावणी होईल. महाराष्ट्र सरकारतर्फे या प्रकरणी एक प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्टात सादर करण्यात आलं. या प्रतिज्ञापत्रात सीबीआय चौकशीला महाराष्ट्र सरकारने विरोध केला आहे. तसेच बिहार सरकारने घेतलेल्या भूमिकेवरही आक्षेप घेतला आहे. न्यूज १८ ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

मागच्या सुनावणीच्या दरम्यान सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र पोलीस आणि बिहार पोलीस यांना तीन दिवसांमध्ये तपास अहवाल सादर करण्यास सांगितलं होतं. दोन्ही अहवाल कोर्टाकडून तपासले जाणार आहेत. दरम्यान सुशांत सिंह मृत्यू प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची घाई का केली असा प्रश्न महाराष्ट्र सरकारने विचारला आहे. तसंच के. के. सिंह हे जाणीवपूर्वक आरोप करत आहेत असंही म्हटलं आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने १४ जून रोजी त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी आत्महत्या केली. या घटनेमुळे सगळं बॉलिवूड हादरलं. मात्र या घटनेनंतर सुशांतचा मृत्यू हा सिनेसृष्टीतली गटबाजी आणि घराणेशाही यामुळे झाला असाही एक आरोप झाला. या संदर्भातल्या बातम्या समोर आल्यानंतर या प्रकरणात महाराष्ट्राच्या गृह खात्याने लक्ष घातलं आणि पोलिसांनी हा अँगल तपासून पाहण्यासाठी आत्तापर्यंत ४० जणांची चौकशी केली आहे