एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. समीर वानखेडे यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. वानखेडे यांच्या विरोधात आलेल्या सर्व तक्रारींची चौकशी अधिकारी करणार आहेत. मुंबईतील चार पोलीस ठाण्यांमध्ये आतापर्यंत समीर वानखेडे यांच्याविरोधात तक्रारी आल्या आहेत, असं सांगण्यात आलंय.

आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर आतापर्यंत अनेक खुलासे झाले आहेत. मंत्री नवाब मलिक गेल्या काही दिवसांपासून समीर वानखेडेंवर आरोप करत आहेत. त्यांनी समीर वानखेडेंचे जन्म प्रमाणपत्र सादर करत काही प्रश्न उपस्थित केले होते. तर, त्यांच्या पहिल्या लग्नाचे फोटो प्रसिद्ध करून वानखेडेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, मलिक यांनी केलेले सर्व आरोप खोटे असून आपण कोणत्याही प्रकारच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचं समीर वानखेडे यांनी म्हटलं होतं. तर, नवाब मलिक यांच्याशिवाय पंच प्रभाकर साईलने देखील समीर वानखेडेंवर आरोप केले होते.

दरम्यान, समीर वानखेडे हे मंगळवारी अंतर्गत चौकशीसाठी दिल्लीच्या एनसीबी मुख्यालयात हजर राहिले होते. आर्यन खान आणि मुंबईतल्या क्रूझवरच्या ड्रग्ज पार्टीप्रकरणी पैसे मागितल्याचा दावा पंच प्रभाकर साईल यांनी केला होता. त्यानंतर घडामोडींना चांगलाच वेग आला असून एनसीबीच्या दक्षता समितीचं पथक अंतर्गत तपासासाठी मुंबईत जाणार आहे. त्यामुळे आता वानखेडे यांची त्यांच्या पदावरुन बदली होऊ शकते, अशा देखील चर्चा सुरू आहेत.