मुंबई: रस्त्यालगत उभ्या केलेल्या बुलेटसारख्या महागड्या दुचाकी चोरून त्यांची विक्री करणाऱ्या एका आरोपीला टिळकनगर पोलिसांनी अटक केली आहे. अटक आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात १५ ते २० गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कुर्ला पश्चिम येथे राहणाऱ्या संदीप सोनकर या तरुणाने २१ जानेवारीला टिळक नगर परिसरात त्याची बुलेट ही दुचाकी उभी केली होती. मात्र काही वेळानंतर तो तेथे आला असता, त्याची दुचाकी घटनास्थळावरून गायब होती. याबाबत त्याने टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तत्काळ तपासाला सुरुवात केली. परिसरातील सीसीटीव्हीमधील चित्रणावरून ही दुचाकी एक अनोळखी इसम घेऊन जात असल्याचे चित्रण पोलिसांना मिळाले. त्यानुसार पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला.
बदलापूर येथे राहणाऱ्या सुनील चौधरी (३२) या आरोपीने ही दुचाकी चोरल्याचे तपासात समोर आले. या आरोपीची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तो राहत असलेल्या बदलापूर परिसरात सापळा रचून त्याला अटक केली. तपासात त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, तो सराईत चोर असल्याचे समोर आले. मुंबईसह ठाणे, नवीमुंबई, नाशिक आणि मध्यप्रदेश याठिकाणी या आरोपीने काही दुचाकी चोरल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल त्याला अटक केली असून पोलीस त्याच्याकडे याबाबत अधिक तपास करत आहेत.

