शिवसेना आमदाराला ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाला राजस्थानमध्ये अटक; मुंबई पोलिसांची कारवाई

२० ऑक्टोबर रोजी आरोपीने महिला असल्याचे भासवून शिवसेना आमदाराकडे मदत मागितली होती

Mumbai Police arrest youth Rajasthan for blackmailing Shiv Sena MLA

शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांचा अश्‍लील व्हिडीओ बनवून त्यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेल युनिटने सोमवारी राजस्थानमधील एका २८ वर्षीय तरुणाला अटक केली. राजस्थानमधील सिकारी जिल्ह्यातील मौसमदीन मेव असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. २० ऑक्टोबर रोजी मेवने महिला असल्याचे भासवून शिवसेना आमदाराकडे मदत मागितली आणि मेसेज करुन संपर्क साधला होता अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

पोलीस अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, कुडाळकर यांनी मदत करण्यास सहमती दर्शवली. त्यानंतर, महिला असल्याचे भासवत मेवने कुडाळकर यांना व्हिडिओ कॉल केला जो काही सेकंद चालला. त्यानंतर मेवने आमदार मंगेश कुडाळकर यांचा एक अश्लील व्हिडिओ बनवला आणि त्याला व्हॉट्सअॅपवर पाठवला. त्यांनतरे मेव कुडाळकर यांच्याकडे पैशांची मागणी करू लागला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुडाळकर यांनी सुरुवातीला काही रक्कम दिली, पण नंतर, जेव्हा मेवने अधिक पैशांची मागणी केली तेव्हा त्यांनी मुंबई पोलिसांशी संपर्क साधला.

त्यानंतर पोलिसांनी भरतपूरला पोहचत स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेतले, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रकरणी “आम्ही गुन्हेगाराचा ट्रान्झिट रिमांड घेतला आहे. त्याच्यासह पोलिसांचे पथक बुधवारी मुंबईत येणार आहे. ते आल्यानंतरच आम्ही कोणतीही प्रतिक्रिया देऊ,” असे पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर (सायबर) यांनी म्हटले.

भरतपूरचे पोलिस अधीक्षक देवेंद्र कुमार विश्नोई यांनी सांगितले की, आरोपी मेवने आमदार मंगेश कुडाळकर यांना व्हिडिओ कॉल करून मदत मागितली. दरम्यान, मौसमदीनने व्हिडिओ रेकॉर्डर अॅपद्वारे त्यांचा अश्लील व्हिडिओ बनवला. व्हिडिओ बनवल्यानंतर आरोपींनी कुडाळकर यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर कुडाळकर यांनी कुर्ला पोलिसांत याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.

गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंबई सायबर क्राईम पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आरोपीचे लोकेशन ट्रेस केले. त्यानंतर राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील आय लोकेशनवरून मुंबई पोलिसांचे पथक भरतपूर येथे पोहोचले. मुंबई पोलिसांनी स्थानिक पोलिसांची मदत घेतली. यावर सिक्रीचे एसएचओ पुरणचंद आणि मुंबई पोलिसांच्या पथकाचे पोलीस निरीक्षक खेत्रे यांनी व्यूहरचना आखली आणि त्याच्या गावात छापा टाकून या आरोपीला पकडले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mumbai police arrest youth rajasthan for blackmailing shiv sena mla abn

Next Story
केरोसीन अनुदानाचे वितरण बँक खात्यांच्या माध्यमातून- अनिल देशमुख
ताज्या बातम्या