Premium

मुंबईत गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान भाविकांच्या मौल्यवान वस्तू लंपास; १६ चोरट्यांना अटक

गिरगाव चौपाटीवर पोलिसांची परवानगी न घेता ड्रोन उडवल्याप्रकरणी २६ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

mumbai police arretsed 16 people for stealing phones, valuables things
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

राज्यात सगळीकडेच गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गणेश चतुर्थीला बाप्पाचे आगमन झाले आणि त्यानंतर (२८ सप्टेंबर) रोजी अनंत चतुर्दशी दिवशी आपल्या लाडक्या गणरायाचे मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले. राज्यभरासह मुंबईत गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, या मिरवणुकांमध्ये काही चोरीच्या घटना देखील घडल्या. लालबागचा राजा आणि अन्य गणपती मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या लोकांचे मोबाइल आणि अन्य किंमती सामान चोरीला गेले. या पार्श्वभूमीवर मुंबईतील काळाचौकी पोलिसांनी भक्तांचे मोबाइल आणि अन्य किंमती सामान चोरल्याबद्दल १६ आरोपींना अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अटक करण्यात आलेल्या एकूण आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. ही महिला आणि इतर सहा आरोपी हे खास अहमदाबादवरुन विसर्जन मिरवणुकीत भाविकांच्या मौल्यवान वस्तू चोरण्यासाठी मुंबईत आले होते असे पोलिसांनी सांगितले . काळाचौकी पोलीस ठाण्यात मोबाइल, सोन्याचे दागिने, पर्स आणि इतर मौल्यवान वस्तूंच्या चोरीचे एकूण १३ गुन्हे दाखल करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबतचे वृत्त Indian Express ने दिले आहे.

हेही वाचा : विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात

”मिरवणुकांमध्ये आमच्याकडून मिरवणुकीत भाविकांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी करणाऱ्यांना पकडण्यासाठी सध्या वेशातील विशेष पथके नेमण्यात आली होती आणि आम्ही एकूण १६ आरोपींना रंगेहाथ पकडले आहे.” अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद भोवटे यांनी दिली. तसेच अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून आठ मोबाइल फोन्स आणि ३.६९ लाख रुपयांच्या इतर मौल्यवान वस्तू जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. ”१६ आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असताना त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे ” असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद भोवटे यांनी सांगितले.

काळाचौकी पोलीस ठाण्यात ४० ते ४५ फोन चोरीला गेल्याच्या तक्रारींची नोंद झाल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. ”आम्ही सामान हरवल्याची तक्रार दाखल करून घेतली असून त्या वस्तू शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत ” असे एका अधिकाऱ्याने सांगितले. दक्षिण मुंबईमध्ये देखील पोलिसांनी गिरगाव चौपाटीवर बेपत्ता झालेल्या २३ मुलांना त्यांच्या परिवाराकडे सोपवले आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले, ”मुले गर्दीत हरवल्याने पालकांनी आमच्याकडे संपर्क साधला. त्यानंतर आमचे पथक चौपाटीवर पाठवण्यात आले व मुलांचा शोध घेऊन त्यांच्या कुटुंबीयांकडे त्यांना सोपवण्यात आले.”

काळाचौकी पोलीस ठाण्यापाठोपाठ दक्षिण मुंबईतील पोलीस ठाण्यांमध्ये देखील गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान ११ फोन चोरीला गेल्याबद्दल गुन्हे दाखल झाले आहेत. डीबी मार्ग पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले, ”या प्रकरणांशिवाय १५ ते २० इतर व्यक्तींनी देखील त्यांचे फोन हरवल्याबद्दल तक्रार दाखल केली आहे. मात्र या प्रकरणांमध्ये कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. मात्र आम्ही त्यांचे फोन शोधण्याचा प्रयत्न करत आहोत.” तर या प्रकरणांशिवाय गिरगाव चौपाटीवर पोलिसांची परवानगी न घेता ड्रोन उडवल्याप्रकरणी २६ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mumbai police arrested 16 thief stealing phones and valuable things during ganpati immersion 2023 tmb 01

First published on: 30-09-2023 at 12:25 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा