मुंबई: खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या एका तरुणाला बुधवारी घाटकोपर पोलिसांनी गांजाची तस्करी केल्याप्रकरणी अटक केली. आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी दहा हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून अमली पदार्थांची तस्करीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे पोलीस रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात गस्त घालत आहेत. घाटकोपर परिसरातील एलबीएस मार्गावरील हॉटेल रोआ परिसरात एक जण बुधवारी सायंकाळी संशयास्पद फिरताना पोलीसांना आढळला. पोलिसांना पाहून तो पळण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी झडती घेतली असता त्याच्याजवळ अडीचशे ग्रॅम गांजा सापडला. त्याची किंमत दहा हजार रुपये आहे.
शमशउद्दीन शेख (२५) असे या आरोपीचे नाव असून तो धारावी परिसरातील रहिवासी आहे. खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या एका कंपनीत डीलव्हरी बॉय म्हणून आपण काम करत असल्याचे त्याने पोलीसांना सांगितले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.