मुंबई: प्रियकराच्या आयुष्यात अचानक दुसरी तरुणी आल्याने संतापलेल्या प्रेयसीने बंदुकीने गोळ्या झाडून तिची हत्या केल्याची घटना मंगळवारी गोवंडी परिसरात घडली. याबाबत शिवाजी नगर पोलिसांनी तपास करत अवघ्या २४ तासांत या हत्येचा छडा लावला असून या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह एकूण चार जणांना अटक केली.

गोवंडीमधील शिवाजी नगर परिसरातील बैंगनवाडी येथे गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास ही घटना घडली. या परिसरात राहणारा आरोपी रिझवान शेख (२८) याचे येथील तबस्सूम शेख (२६) या महिलेसोबत प्रेमसबंध होते. मात्र, याचदरम्यान त्याच्या आयुष्यात शिफा शेख (१९) ही तरुणी आली. यावरून या तिघांमध्ये अनेकदा वाद झाला होता. याच कारणावरून मंगळवारी सकाळी तिघांचे कडाक्याचे भांडण झाले. यावेळी आरोपी तबस्सूमने बंदुकीने शिफावर दोन गोळ्या झाडून तिची हत्या केली.

या घटनेनंतर घाबरलेल्या आरोपींनी शिफाला तत्काळ गोवंडीमधील शताब्दी रुग्णालयात दाखल केले, मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आरोपींनी रुग्णालयातून पळ काढला. शिवाजी नगर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना आरोपींची ओळख पटली. त्यानुसार पोलिसांनी रात्री उशिरा रिझवान शेख (२८), तबस्सूम शेख (२६), साजिद शेख (२३) आणि कलाम चौधरी (१९) यांना अटक केली. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.