मुंबई : बारा वर्षांच्या मुलीने प्रसंगावधानता दाखवल्यामुळे अश्लील कृत्य करणाऱ्या ६५ वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. आरोपी पीडित मुलीला पाहून अश्लील कृत्य करीत होता. तिने या सर्व प्रकाराचे मोबाइलमध्ये चित्रीकरण केल्यामुळे हा प्रकार उघड झाला. त्यामुळे आरोपीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
पोलिसांनी मंगळवारी ६५ वर्षीय आरोपीला अटक केली. आरोपी टपाल विभागातून निवृत्त झाला आहे. मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीनुसार,आरोपीने मे महिन्यात अल्पवयीन मुलीला पाहून अश्लील हावभाव केले. ती शिकवणीसाठी गेली असता त्याने तिचा विनयभंग केला. हा प्रकार पीडित मुलीने आईला सांगितला. पण तिचा गैरसमज झाल्याचे समजून पीडित मुलीच्या आईने कोणतीही तक्रार केली नाही. पण त्यानंतर पीडित मुलीनेच आरोपीचे कृत्य उघड करण्याचे ठरवले.
अलिकडेच, आरोपीने तिच्याकडे पाहून काही अश्लील हावभाव केले. त्यावेळी तिने तिच्या मोबाइलमध्ये त्याचे चित्रिकरण केले. तिने ती चित्रफित आईला दाखवली. चित्रफित पाहून आईला धक्का बसला. त्यानंतर मुलीच्या आईने पतीला हा प्रकार सांगितला आणि दोघे मुलीला ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात घेऊन आले, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
पोलीस ठाण्यात मुलीने ती चित्रफित पोलिसांना दाखवली आणि तिच्यावर झालेला अत्याचाराची माहिती दिली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने कारवाई केली आणि आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील (बीएनएस) कलम ७४ आणि ७९ आणि लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायद्याच्या कलम ८ आणि १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी ६५ वर्षीय आरोपीला अटक केली. आरोपीला नोटीस देऊन सोडण्यात आले. आरोपीने परिसरातील इतर मुलांसोबतही अशा प्रकारे कृत्य केले आहे का याबाबत पोलीस तपास करीत आहेत.