प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गुगलचे पहिले भारतीय सीईओ सुंदर पिचाई यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार जाहीर केला. सुंदर पिचाई यांचे व्यापार आणि उद्योग या श्रेणीतील उल्लेखनीय योगदान लक्षात घेऊन त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे. त्यानंतर आता पिचई यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. मुंबई पोलिसांनी सुंदर पिचई यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.बॉलिवूडमधील निर्माते दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी मुंबईत गुगलचे सीईओ पिचाई आणि गुगलच्या सहा अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कॉपीराइट उल्लंघन प्रकरणी २५ जानेवारी रोजी ही तक्रार नोंदवण्यात आली आहे. सुनील दर्शन यांनी सांगितले की, यूट्यूब आपल्या चित्रपट आणि संगीताच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहे आणि त्यासाठी ते ११ वर्षांपासून संघर्ष करत आहेत. निर्माता-दिग्दर्शक म्हणून सुनील दर्शन यांचा शेवटचा चित्रपट ‘एक हसीना थी एक दीवाना था’ हा २०१७ मध्ये प्रदर्शित झालेला होता.

न्यायालयाच्या निर्देशानुसार, मुंबई पोलिसांनी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि कंपनीच्या इतर पाच अधिकाऱ्यांविरुद्ध कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चित्रपट दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी आपल्या तक्रारीत, गुगलने अनधिकृत व्यक्तींना त्यांचा चित्रपट ‘एक हसीना थी एक दीवाना था’ यूट्यूबवर अपलोड करण्याची परवानगी दिली होती, असे म्हटले आहे.

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यासह सहा जणांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याबाबत सुनील दर्शन यांनी याबाबत भाष्य केले आहे. “मी गेल्या ११ वर्षांपासून हे युद्ध लढत होतो. मी सरकारकडून गुगल आणि यूट्यूबच्या बड्या अधिकाऱ्यांना अनेक पत्रे, विनंत्या लिहिल्या, पण कोणी ऐकले नाही. कोणीही उत्तर द्यायला तयार नव्हते. विशेष म्हणजे माझी तक्रार नोंदवायलाही कोणी तयार नव्हते. त्यानंतर मी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आणि कोर्टाच्या आदेशानंतरच मी गुन्हा दाखल करू शकलो,” असे सुनील दर्शन म्हणाले.

“मी गेल्या काही काळापासून फक्त हे युद्ध लढत आहे. याआधी मी एका वर्षात एक-दोन चित्रपट करायचो, पण मला वाटायचं की जेव्हा इतरांना असा फायदा व्हायचा असेल, तर आधी हे युद्ध का लढू नये,” असेही सुनील दर्शन म्हणाले.

दरम्यान, तामिळनाडूमध्ये जन्मलेले सुंदर पिचाई २०१५ साली जगातील गुगलचे सीईओ बनले. ते भारतीय वंशाचे पहिले नागरिक होते ज्यांना गुगल मध्ये सर्वात मोठी जबाबदारी मिळाली. गुगलचे सह-संस्थापक लॉरी यांनी सुंदर पिचाई यांना गुगलचे सीईओ म्हणून घोषित केले आणि अशी प्रतिभावान व्यक्ती आपल्यामध्ये असल्याने मी स्वतःला भाग्यवान समजतो, असे म्हटले होते.

सुंदर पिचाई यांचा जन्म तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे झाला. एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले सुंदर पिचाई यांचे वडील इलेक्ट्रिक इंजिनियर होते पण आर्थिक दुर्बलतेमुळे ते त्यांना चांगले शिक्षण देऊ शकले नाहीत. सुंदर पिचाई यांनी १९९३ मध्ये आयआयटी खडगपूरमधून बीटेक केले. यानंतर स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमएस आणि व्हार्टन स्कूलमधून एमबीए केले. व्हार्टन स्कूलमध्ये शिकत असताना त्यांना दोन शिष्यवृत्ती मिळाल्या.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai police books google ceo sundar pichai for copyright act violation abn
First published on: 26-01-2022 at 16:52 IST