तपास चक्र : ‘एटीएम’मुळे उकल

मानखुर्द परिसरात राहणारी रोहिणी घोरपडे ही २८ वर्षांची विधवा तरुणी दोन दिवस उलटले तरी घरी आली नाही

(संग्रहित छायाचित्र)

निशांत सरवणकर @ndsarwankar

nishant.sarvankar@expressindia.com

मोबाइल, एटीएम, सीसीटीव्ही फुटेज आदी आधुनिक साधनांमुळे पोलिसांना गुन्ह्य़ाचा तपास करणे तुलनेने सोयीचे ठरू लागले आहे. मानखुर्दमधील तरुणाचे गायब होण्याचे गूढ ‘एटीएम’मुळे उकलले..

मानखुर्द परिसरात राहणारी रोहिणी घोरपडे ही २८ वर्षांची विधवा तरुणी दोन दिवस उलटले तरी घरी आली नाही. मैत्रिणीच्या लग्नाला जाते, असे सांगून ती घराबाहेर पडली होती. तिचा मोबाइल फोनही बंद आढळून येत होता. नातेवाईक, मैत्रिणींकडेही चौकशी करण्यात आली. परंतु तिचा ठावठिकाणा लागत नव्हता. अखेर तिच्या भावाने मानखुर्द पोलीस ठाण्यात ती हरविल्याची तक्रार दिली.

१४ नोव्हेंबर २०१८ ची ही घटना. मानखुर्द पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नितीन बोबडे यांना या प्रकरणात काहीतरी काळेबेरे असावे, असे वाटत होते. त्यामुळे रोहिणी हरविल्याच्या तक्रारीची त्यांनी गांभीर्याने दखल घेतली. १६ ते १८ वा २० वर्षे वयोगटातील अल्पवयीन तरुणी घरातून निघून गेल्यानंतर त्या परत येण्याची वा त्यांची काही माहिती मिळण्याची पोलीस वाट पाहत असत. परंतु रोहिणी गायब होण्याबाबत पोलिसांना असे काही वाटत नव्हते.

रोहिणीच्या मोबाइल क्रमांकाचा संपूर्ण तपशील पोलिसांनी संबंधित कंपनीकडून मागविला. फोन करण्यासाठी मोबाइलचा फारसा वापर करण्यात आला नव्हता. त्यामुळे कुठलाही दुवा पोलिसांच्या हाती लागला नाही. वाशी येथील महापालिका इस्पितळात रोहिणी स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करीत होती. रोहिणीची अधिक माहिती मिळावी, यासाठी पोलीस इस्पितळात पोहोचले. त्याच इस्पितळात काम करणाऱ्या सुनील शिर्के याच्यासोबत तिचे मैत्रीचे संबंध असल्याची पुसटशी माहिती मिळाली. अधिक चौकशीत त्यावर शिक्कामोर्तब झाले. शिर्केसोबत त्यांचे संबंध खूपच पुढे गेल्याची माहितीही या तपासादरम्यान मिळाली. त्यामुळे  शिर्केला पोलिसांनी चौकशीसाठी बोलाविले. रोहिणी आपली चांगली मैत्रीण आहे. मात्र तिच्या गायब होण्याशी आपला काहीही संबंध नाही, असे तो पोलिसांना सांगू लागला. या चौकशीत पोलिसांच्या हाती काहीही लागले नाही तरी पोलिसांना त्याच्यावरच दाट संशय होता. थेट पुरावा हातात नसल्यामुळे पोलिसांनी त्याला चौकशीनंतर जाऊ दिले. साध्या वेशातील पोलिसांची त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली. मात्र त्याच्या हालचालींवरून पोलिसांच्या दाव्याला पुष्टी मिळत नव्हती.

पोलिसांनी रोहिणीबाबत अधिक माहिती मिळविली. तिच्या पहिल्या पतीचा मृत्यू झाला होता. तिला नऊ वर्षांची मुलगी होती. शिर्केमुळेच तिला वाशीच्या महापालिका इस्पितळात ‘स्वच्छता कर्मचारी’ म्हणून नोकरी मिळाली होती. रोहिणी गायब झाली, त्या काळात तिच्या दोन बँक खात्यांच्या एटीएम कार्डाचा वापर करून ६५ हजार रुपये काढण्यात आले होते. हा दुवा पोलिसांसाठी खूप महत्त्वाचा होता. वाशी आणि कोपरखैरणे येथील ज्या एटीएम केंद्रामधून पैसे काढण्यात आल्याची माहिती मिळाली होती, त्या दोन्ही एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले. रोहिणीच्या खात्यातून पैसे काढणाऱ्या व्यक्तीचे छायाचित्र पोलिसांना मिळाले. हे छायाचित्र शिर्केला दाखविण्यात आले. परंतु आपण त्याला ओळखत नाही, असे त्याने सांगितले.

या छायाचित्रावरून पोलिसांनी संबंधित इसमाचा शोध घेतला. नवी मुंबईत राहणारा हा इसम एका केबल ऑपरेटरकडे काम करीत होता. अधिक चौकशी केली असता, संबंधित इसम गावी गेल्याची माहिती मिळाली. गावावरून परत आलेल्या या इसमाला म्हणजेच रामचंद्र जाधव याला पोलिसांनी ताब्यात घेतले. शिर्केला तो चांगलाच ओळखत होता. जाधव आणि शिर्के यांना समोरासमोर आणण्यात आले आणि मग रोहिणी गायब होण्यामागील गूढ उकलण्यात पोलिसांना वेळ लागला नाही.

गेल्या चार वर्षांपासून रोहिणी आणि शिर्के यांच्यात प्रेमसंबंध होते. जवळजवळ दोन दशके या इस्पितळात काम करणाऱ्या शिर्केमुळेच रोहिणीला नोकरी मिळाली होती. जाधवच रोहिणीला घेऊन एक दिवस शिर्केकडे आला होता. रोहिणीला नोकरी हवी होती. याच इस्पितळात नोकरी मिळाल्यानंतर दोघांमधील संबंध वाढत गेले. आपल्याशी लग्न करावे, असा तगादा रोहिणीने शिर्केच्या मागे लावला होता. हे कथित प्रेमप्रकरण शिर्केच्या पत्नीच्या कानावरही गेले होते. शिर्केला दोन मुले होती. त्याच्या बायकोने सोडचिठ्ठी देण्याची धमकी दिली होती. दुसरीकडे रोहिणीने लग्नासाठी सतत तिच्या पाठी घोशा लावला होता. अखेरीस रोहिणीचा कायमचा काटा काढण्याचे शिर्केने ठरविले. त्यासाठी जाधवची मदत घेतली आणि कट रचला.

जाधवला आपल्या कटाची कल्पना शिर्केने दिली. ११ नोव्हेंबर रोजी जाधवला रायगडला जाण्यास शिर्केनेच सांगितले. तेथील एका जंगलात त्याला खड्डा खणण्यास सांगण्यात आले. या खड्डय़ात रोहिणीचा मृतदेह पुरण्याचे ठरले. ठरलेल्या योजनेनुसार, शिर्केने रोहिणीला १४ नोव्हेंबर रोजी भेटायला बोलाविले होते. परंतु त्यासाठी मोबाइलचा वापर टाळला. पोलिसांच्या रडारवर येऊ नये, यासाठी ही काळजी घेतली. लग्नाचे आमिष दाखविले. घरी खोटे कारण सांगून १४ नोव्हेंबर रोजी रोहिणी घरातून निघाली. वाटेत तिला शिर्के भेटला. विजयसिंह मोरे या गाडी चालकासह शिर्के रोहिणीसह रायगडच्या दिशेने निघाला. वाटेत त्याने रोहिणीला भरपूर मद्य प्यायला दिले. मद्याच्या नशेत असलेल्या रोहिणीच्या डोक्यावर कुऱ्हाडीच्या दांडय़ाचा जोरदार प्रहार केला. त्यानंतर तिच्याच साडीने गळा दाबून ती मेल्याची खात्री केली. खड्डा खणून जाधव वाट पाहत होता. गाडी चालक मोरे, जाधव यांच्या मदतीने शिर्केने रोहिणीला तेथे पुरले. त्यानंतर रायगडमध्येच राहणारा शिर्के आपल्या घरी गेला तर जाधव व मोरे नवी मुंबईत आले. रोहिणीची एटीएम कार्डे आणि पिन क्रमांक शिर्केने जाधवला दिली. जाधवने वाशी आणि कोपरखैरणे येथील एटीएममधून ६५ हजार रुपये काढले. त्याचमुळे रोहिणीच्या हत्येची उकल झाली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mumbai police crack rohini ghorpade murder case with help of atm

ताज्या बातम्या