मुंबई: अल्पावधीत ‘टेक्नो काॅन्सर्ट हब’ बनलेल्या मुंबईत अनेक आंतरराष्ट्रीय डीजे आणि बॅण्डचे कार्यक्रम होत आहेत. शुक्रवार, शनिवार आणि रविवारसाठी या कार्यक्रमांची रेलचेल मोठी असते. गोरेगाव नेस्को सेंटर येथील काॅन्सर्ट मधील दोन तरुणांच्या मृत्यू झाल्यानंतर मुंबईतील प्रत्येक टेक्नो काॅन्सर्टवर पोलिसांची करडी नजर आहे. पोलिसांनी हाती घेतलेल्या तपासणी मोहिमेमुळे शनिवारी शिवडी येथे होणारा एक मोठा काॅन्सर्ट ऐनवेळी रद्द करण्याची वेळ आयोजकांवर आली.

गोरेगाव नेस्को सेंटर मधील काॅन्सर्ट मध्ये अंमली पदार्थांच्या अति सेवनामुळे दोन तरुणांचा जीव मागील आठवडयात गेला. मुंबईतील काॅन्सर्ट आणि अंमली पदार्थ हे एक समीकरण झाले आहे. त्यामुळे मुंबईसह राज्याची वाटचाल पंजाबच्या दिशेने सुरु असल्याची चर्चा आहे. गोरेगाव घटनेनंतर पोलिस सर्तक झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंमली पदार्थ सेवन अथवा विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यात या मनोरंजन कार्यक्रमाचा पहिला क्रमांक लागतो.

बीकेसी मधील एका आंतरराष्ट्रीय करमणूक सेंटर मध्ये यातील मोठे काॅन्सर्ट होत असतात. रविवारी (१९ एप्रिल) रात्री या सेंटर मध्ये एक मोठी टेक्नो काॅन्सर्ट आयोजित पार पडला. हा मुंबईतील सर्वात मोठा टेक्नो अंडरग्राऊड म्युझिक काॅन्सर्ट मानला जातो. सहा जून रोजी एसव्हीपी स्टेडियम डोम येथे एक काॅन्सर्ट होणार आहे. १८ ते २० डिसेंबर रोजी होणाऱ्या देशातील सर्वात मोठया इलेट्राॅनिक्स म्युझिक फेस्टिवलचे आरक्षण सुरु झाले आहे. लोअर परेल, वांद्रे, अंधेरी या ठिकाणी नियमित टेक्नो नाईटस होत असतात.

या काॅन्सर्टमध्ये अंमली पदार्थांचे सेवन करुन तरुणाई येते. काही काॅन्सर्ट मध्ये अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांची घुसखोरी होते. या सर्वांवर पोलिसांची करडी नजर आहे.अंमली पदार्थांचे सेवन केल्याशिवाय या टेक्नो काॅन्सर्ट कार्यक्रमांना हजर राहणे मुश्किल होते. या कार्यक्रमांतील आवाजाची मर्यादा अतिशय उच्च असते. डिसिबल मर्यादाचा निकष या ठिकाणी लागू होत नाही. हा आवाज बाहेर येत नसल्याने त्याचा सर्वसामान्यांना त्रास होत नाही. बंद दरवाजा आड हा आवाज सहन करण्याची क्षमता यावी म्हणून या अंमली पदार्थांचे सर्रास सेवन केले जात असल्याचे एका उच्च महिला पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.