मुंबई : मुंबई पोलिसांचे गुन्हे उकल प्रमाण वाढले असून ते सरासरी ८५ टक्के इतके आहे. गेल्या सहा वर्षांतील हे सर्वोत्तम आहे. गंभीर गुन्ह्यांपैकी हत्या आणि चोरी प्रकरणातील प्रमाण ९९ टक्के तर हत्येचा प्रयत्न आणि दरोडा प्रकरणाची शंभर टक्के उकल झाल्याचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सध्या सायबर फसवणुकीचे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत आठ महिन्यांत फसवणुकीच्या रकमेपैकी २७.६३ टक्के रक्कम गोठवण्यात पोलिसांना यश आले आहे. आतापर्यंतची ही सर्वोच्च टक्केवारी आहे. २०२२ मध्ये हे प्रमाण फक्त ४.९ टक्के होते. पीडितांची १८६.३६ कोटी रुपयांची रक्कम परत मिळण्यासाठी गोठवण्यात आल्याचेही भारती यांनी सांगितले.
अंमली पदार्थविरोधी मोहिमही उघडण्यात आली असून २०२४ पासून तीन हजार ५२ प्रकरणांमध्ये १६०६ कोटी रुपये किमतीचे सहा हजार ३७१ किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून अमली पदार्थांचे ११ कारखाने नष्ट करण्यात आले आहेत. याशिवाय अमली पदार्थांच्या तस्करीतील पाच मुख्य आरोपींना प्रत्यार्पणानंतर अटक करण्यात आली, अशी माहितीही आयुक्तांनी दिली. ब्लॉक केलेल्या मोबाईल फोनपैकी ५१.१३ टक्के मोबाईलचा शोध लावून ते परत मिळवण्यात यश आले आहे. या मोहिमेत आठ हजार ३९ मोबाईलचा शोध लागला. हे मोबाईल संबंधितांना परत करण्यात आले. याशिवाय महिलांवरील गुन्ह्यांमध्ये चार टक्के घट झाली असून महिला अत्याचाराशी संबधित जवळपास सर्व गुन्ह्यांची उकल करण्याचे प्रमाण वाढले आहे, याकडे आयुक्तांनी लक्ष वेधले.
याशिवाय प्रदीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या ५५९ फरारी आरोपींना अटक करण्यात आली. यापैकी ४९ आरोपी २० वर्षांहून अधिक काळापासून फरार होते. अशी माहिती त्यांनी दिली. ऑगस्टअखेरपर्यंत एक हजार ६६ बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांना हद्दपार करण्यात आले. गेल्या वर्षी ही संख्या १,०६१ तर २०२४ मध्ये हद्दपार केलेल्या बांगलादेशींची संख्या फक्त १६४ होती, असेही आयुक्तांनी सांगितले. २०२४ पासून १६ सराईत गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्यात आले. यापैकी या वर्षांत १३ जणांवर कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये (मकोका) ११ गुन्हे दाखल करण्यात आले.
यामध्ये अमली पदार्थ तस्करीचा एक गुन्हा आहे. या प्रकरणांत ६१ आरोपींना अटक करण्यात आली आहे. २०२४ पासून शाळा/महाविद्यालयांमध्ये एकूण ११ हजार २९२ जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात आले. त्यात सुमारे चार लाख २४ हजार ४८२ विद्यार्थी/शिक्षक/पालकांनी सहभाग नोंदवला, असेही त्यांनी सांगितले.
