लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई: मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी कक्षाने (एएनसी) बदलापूर-कर्जर मार्गावरील येथे कारवाई करून मेफेड्रॉनचा (एमडी) कारखान उध्वस्त केला. वांगणी येथे हा कारखाना सुरू होता. या कारवाईत चौघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींपैकी एकाने रसायनशास्त्राचे शिक्षण घेतले असून तो एका कंपनीत निर्मिती व्यवस्थापक म्हणून काम करत होता.
एएनसीच्या घाटकोपर युनीटने गस्तीवेळी ११ तारखेला मानखुर्द परिसरात एमडी विकणाऱ्या दोघा तस्करांना पकडले होते. त्यांच्या ताब्यात १०६ ग्रॅम एमडी सापडले होते. दोघांच्या चौकशीत तिसऱ्या आरोपीचे नाव उघड झाले. त्यालाही शोधून पकडण्यात आले. तिसऱ्या आरोपीकडे कसून चौकशी केल्यावर बदलापूर-कर्जत मार्गावरील वांगणी येथे एमडी बनविण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्या कारखान्यावर धाड टाकली असता २०६ किलो वजनाची विविध रसायने व एक किलो ५८० ग्रॅम वजनाची एमडी सदृश्य पांढरी भुकटी सापडली आहे.
आणखी वाचा-मुंबई : अनंत चतुर्दशीला वीस हजारांहून अधिक पोलिसांचा शहरभर बंदोबस्त
दरम्यान, कारखान्यात ज्या आरोपीच्या मार्गदर्शनाखाली एमडी बनविले जाते त्या चौथ्या आरोपीची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या चौथ्या आरोपीलाही ताब्यात घेतले आहे. अटक आरोपींपैकी चौथ्या आरोपीने रसायनशास्त्राचे शिक्षण घेतले आहे. बदलापूर येथील एका कंपनीत तो निर्मिती व्यवस्थापक म्हणून काम करतो. झटपट पैसे मिळवण्यासाठी तो एमडी तयार करू लागल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.