Mumbai Police Dog Jessy News : पोलीस दलातील किंवा सैन्यातील श्वान पथकं वासावरून आरोपीला पकडतात किंवा ते आरोपी जिधे लपून बसले असतील तिथपर्यंत पोलिसांना नेण्याचं काम करतात. अशा अनेक श्वानांचे प्रसंग आपण चित्रपटांमधून पाहिले आहेत, अशा घटनांची माहिती वर्तमानपत्रांमध्ये वाचली आहे. बॉम्बशोधक पथकातील श्वानांनी बॉम्ब शोधल्याच्या बातम्या आपण वाचल्या आहेत. आपल्या सुरक्षेत पोलिसांइतकंच या श्वानांचं देखील योगदान आहे. अशाच मुंबई पोलिसांच्या श्वान पथकातील ‘जेसी’ नावाच्या एका श्वानाच्या कामगिरीची माहिती पोलिसांनी शेअर केली आहे. मुंबई पोलिसांनी या श्वानाच्या कामगिरीची माहिती देणारा एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर केला आहे.

या व्हिडीओत मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे की “पोलीस दलातील श्वान पथकाचं सामर्थ्य काय असू शकतं याचा विचार तुम्ही कधी विचार केला आहे का? फक्त एका चप्पलवरून बँक चोरीचा मागोवा काढणे, साडी नेसून लपलेल्या आरोपीला ओळखणे, गणपती विसर्जन मिरवणुकीतून अपहरण केलेल्या मुलाला शोधून काढणे, या सगळ्या गुन्ह्यांचा छडा लावलाय मुंबई पोलिसांची श्वान जेसी हीने.”

दरम्यान, जेसीच्या हस्तक पोलीस हवालदार सुरेखा लोंढे यांनी जेसीच्या कामगिरीची माहिती दिली. त्या म्हणाल्या, “मी गेल्या चार वर्षांपासून पोलीस श्वान जेसी हिची हस्तक म्हणून कार्यरत आहे. या चार वर्षांमध्ये जेसीने अनेक गुन्ह्यांचा छडा लावला आहे.”

नुसत्या चप्पलच्या वासावरून जेसीने लावला बँक चोरी व खून प्रकरणाचा छडा

हवालदार लोंढे म्हणाल्या, “बँकेवरील दरोडा आणि खून प्रकरणाचा तिने अत्यंत हुशारीने गुन्ह्यांचा छडा लावला होता. आरोपी बँकेतून पैसे चोरून व खून करून पळून गेला होता. मात्र आम्ही आरोपीच्या चप्पलचा वास जेसीला दिला. त्यानंतर. जेसी आम्हाला घेऊन एका बाजारात गेली. बाजारातून वाट काढत, छोट्या गल्ल्या पालथ्या घालत पाच किलोमीटर पायपीट करून जेसीने आम्हाला एका बंद घरासमोर नेलं. तिथे ती भुंकू लागली. आम्ही दरवाजा उघडल्यानंतर आतमध्ये लपून बसलेल्या आरोपीला ताब्यात घेतलं. त्यानेच चोरी व खून केल्याचं नंतर सिद्ध झालं.”

गणपती विसर्जन मिरवणुकीती अपहरण झालेल्या मुलाला वाचवलं

जेसीच्या हस्तक हवालदार लोंढे यांनी जेसीच्या आणखी एका कामगिरीविषयी सांगितलं की “मालवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीतून एका लहान मुलाचं अपहरण झालं होतं. विसर्जन मिरवणुकीचा गोंधळ व गर्दीतून वाट काढत जेसी आम्हाला एका ठिकाणी घेऊन गेली. तिथून टॅक्सीतून आरोपीने मुलाला अपहरण करून नेलं होतं. तिथलं सीसीटीव्ही फुटेज आम्ही तपासलं. त्यामधून आरोपी व टॅक्सीची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला पकडलं आणि लहान मुलाला आरोपीच्या तावडीतून सोडवलं. जेसीने अशा अनेक गुन्ह्यांचा छडा लावला आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओच्या शेवटी पोलिसांनी म्हटलं आहे की अतुट निष्ठा उपजत ज्ञानआमची श्वान पथकं गुन्हेगारांचा नेहमीच बारकाईने तपास करते.