मुंबई : पोलाद पुरवठ्याच्या निमित्ताने मुंबईतील कंपनीची ३६ कोटी १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली नागपूर येथील ४३ वर्षीय व्यावसायिकाला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. मुर्तझा युसूफ शाकीर असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ७९ लाख २५ हजार रुपये गोठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुंबईतील डी. आय. स्टील कंपनीची फसवणूक केल्याचा मुर्तझावर आरोप आहे.

कंपनीच्या वतीने सिद्धार्थ मगिया यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेने गेल्यावर्षी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. तक्रारीनुसार, त्यांनी १७ फेब्रुवारी ते १३ मे २०२४ दरम्यान ६३२९.९४ मेट्रिक टन पोलाद पुरवणाचे आमिष दाखवून कंपनीकडून ३६ कोटी १५ लाख ७६ हजार रुपये स्वीकारण्यात आले होते. पण प्रत्यक्षात आरोपीने मुंबईतील कंपनीला पोलाद पुरवठा केलाच नाही. तसेच तक्रारदार कंपनीकडून घेतलेले ३६ कोटी १५ लाख रुपयेही परत केले नाही. याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम ४०९ व ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटकेनंतर गुरूवारी आरोपीला न्यायालयापुढे हजर करण्यात आले. सध्या आरोपी पोलीस कोठडीत आहे.

प्राथमिक तपासात तक्रारदार कंपनीने जमा केलेल्या ३६ कोटी १५ लाख रुपयांपैकी काही रक्कम इतर बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहे. आरोपी मुर्तझाने फसवणूकीतील काही रक्कम स्वतःच्या व नातेवाईकांच्या खात्यात वळती केल्याचे पोलिसांना तापसात उघड झाले. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने आरोपी मुर्तझाला तपासासाठी उपस्थित राहण्यासाठी नोटीस बजावली होती. पण तो वारंवार टाळत होता, अखेर पोलिसांनी त्याला याप्रकरणी अटक केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपहाराची रक्कम आरोपीच्या कंपनीच्या चालू खात्यात जमा झाली होती. आरोपीकडून इतर व्यापाऱ्यांनाही १० कोटी ५३ लाख रुपये देणे बाकी आहे, अशी माहिती एका साक्षीदाराने पोलिसांना दिली. त्याची पडताळणी करण्यात येत आहे. पोलिसांनी याप्रकरणी ७९ लाख २५ हजार रुपये गोठवले आहेत. आरोपीने फसवणूकीतील रक्कम दोन कंपन्यांद्वारे इतरत्र वळवली. तसेच काही रक्कम नातेवाईकांच्या खात्यात वर्ग केली. आरोपीविरोधात नागपूरमध्येही गुन्हा दाखल होता. त्याप्रकरणी अटक झाल्यानंतर स्थानिक न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनवली होती. त्याप्रकरणी त्याची रवानगी नागपूर मध्यवर्ती कारागृहात करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तेथे जाऊन आरोपी मर्तझाचा ताबा घेतला. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करीत आहे.