मुंबई : मुंबई पोलीस दलाच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर वाहन ताफ्यात ९६ वाहनांची भर पडणार आहे. गृह विभागाने ही वाहने देण्यास मान्यता दिल्याने दलाची एकूण वाहन क्षमता ४,४८९ वरून ४,५८५ झाली आहे.

मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि कायदा-सुव्यवस्थेचा वाढता ताण लक्षात घेता, राज्य शासनाने मुंबई पोलीस दलाच्या विस्ताराला मंजुरी दिली आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत आता ४ नवीन पोलीस ठाणी, २ नवीन परिमंडळे (झोन) आणि ३ नवीन सहायक पोलीस आयुक्त विभाग निर्माण करण्यात येत आहेत. या मोठ्या पायाभूत आणि प्रशासकीय बदलांसाठी शासनाने कोट्यवधी रुपयांच्या निधीसह १,५१२ नवीन पदांच्या निर्मितीला मंजुरी दिली आहे.

या नवीन पोलीस ठाण्यांच्या निर्मितीमुळे मुंबईतील एकूण पोलीस ठाण्यांची संख्या आता ९६ वरून १०० वर पोहोचली आहे. ही चार नवीन पोलीस ठाणी, दोन परिमंडळे आणि तीन सहायक पोलीस आयुक्त विभागांसाठी ही तरतूद करण्यात आली आहे. मंजूर वाहनांमध्ये ४० मोटारसायकलींचा समावेश आहे. चार नवीन पोलीस ठाण्यांना प्रत्येकी दहा मोटारसायकली मिळणार आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक ठाण्यासाठी दोन याप्रमाणे आठ लाईट व्हॅन देण्यात येणार आहेत.

तीन सहायक पोलीस आयुक्त विभागांसाठी तीन जीप, तर या विभागांसह चार नवीन पोलीस ठाण्यांसाठी एकूण ३१ जीप, मोबाइल स्कॅनर मंजूर करण्यात आले आहेत. दोन नवीन परिमंडळ कार्यालयांसाठी प्रत्येकी चार याप्रमाणे आठ ट्रूप कॅरिअर (बस) देण्यात येतील. तसेच प्रत्येक परिमंडळासाठी दोन याप्रमाणे चार मोबाइल हॉस्पिटल, हर्स, डेल्टा, ॲम्ब्युलन्स वाहने मंजूर झाली आहेत. दोन नवीन पोलीस उपायुक्त पदांसाठी दोन कार, तर तीन सहायक पोलीस आयुक्त कार्यालयांसाठी तीन रक्षक वाहने देण्यात येणार आहेत.